व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vanchit Bahujan Aghadi : रेल्वे उड्डाणपूल ९ वर्षांपासून ‘वंचित’; ५४ कोटी निधीचा...

Vanchit Bahujan Aghadi : रेल्वे उड्डाणपूल ९ वर्षांपासून ‘वंचित’; ५४ कोटी निधीचा गोंधळ

akola railway over bridge project stalled since 9 years : ८० टक्के काम पूर्ण तरीही दुर्लक्ष, वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला प्रश्न

Akola शहरातील न्यू तापडिया नगर, गेट क्रमांक ३८ येथील रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) प्रकल्प गेल्या सुमारे नऊ वर्षांपासून रखडलेला असून, त्यामुळे हजारो नागरिकांना दररोज हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पुलाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असतानाही उर्वरित कामासाठी आवश्यक ५४ कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्षात उपलब्ध न झाल्याने प्रकल्प ठप्प झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा गटनेते नीलेश देव यांनी केला आहे.

मागील महिन्यात ९ व १० मार्च रोजी स्थानिक वृत्तपत्रांत या प्रकल्पासाठी ५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर जवळपास महिनाभराने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), अकोला येथे चौकशी केली असता विभागाकडे अद्याप कोणताही निधी प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट झाले.

या संदर्भात ६ एप्रिल रोजी मुंबईतील वित्त विभागात पाठपुरावा करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावाची फाईल सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्र्यांच्या स्तरावर प्रलंबित असून, पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच आदेश निर्गमित होतील. त्यामुळे निधी मंजुरीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Amruta Fadnavis : नारीशक्तीसाठी मोदी भक्कम, पण ‘लव्ह जिहाद’पासून मुलींनी सावध राहावे; अमृता फडणवीस कडाडल्या!

गेल्या दीड वर्षांपासून गेट क्रमांक ३८ बंद असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यात तीव्र उष्णतेत दीर्घकाळ थांबावे लागते, तर पावसाळ्यात ३ ते ४ फूट पाणी साचून वाहतूक विस्कळीत होते. १४ एप्रिल रोजी पंचशील नगर येथे लागलेल्या आगीच्या घटनेदरम्यान अग्निशमन दल व रुग्णवाहिका वेळेत पोहोचण्यात अडचणी निर्माण झाल्याने या समस्येचे गांभीर्य अधोरेखित झाले.

या प्रकरणी परिसरातील सुमारे १० हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह शासनाकडे अनेक निवेदने देण्यात आली आहेत. तसेच अॅड. नरेंद्र बेलसरे यांनी न्यायालयातही यासंदर्भात दाद मागितली आहे. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, अद्याप निधी वितरण, कामाची गती किंवा स्पष्ट वेळापत्रक याबाबत कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही.

Nagpur congress : जिचकारांचे नाव पुढे करताच काँग्रेसचा एमआयएमला ‘दे धक्का’; आसीनगर झोन सभापती निवडणुकीत केला गेम

निधी मंजूर झाल्याच्या बातम्या नेमक्या कोणत्या आधारावर प्रसिद्ध झाल्या, निधी प्रत्यक्षात का पोहोचला नाही, तसेच निधी मंजूरच नसेल तर नागरिकांची दिशाभूल का करण्यात आली, असे प्रश्न नीलेश देव यांनी उपस्थित केले आहेत.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने संयुक्त अधिकृत निवेदन जारी करून निधी मंजुरीची सद्यस्थिती, रेल्वे विभागाच्या कामाचे वेळापत्रक, मेगा ब्लॉकची तारीख आणि प्रकल्प पूर्ण होण्याची अंतिम मुदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रकल्पाबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास न्यू तापडिया नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नीलेश देव यांनी दिला आहे.

error: Content is protected !!