Respect cannot be demanded; Alka Atram targets MP Pratibha Dhanorkar : आदिवासी समाजाकडून निषेध; महिलांसाठी कोणते काम केले, खासदारांना सवाल
Chandrapur राजमाता राणी हिराई यांच्या सन्मानार्थ आयोजित ऐतिहासिक सोहळ्याला गालबोट लावल्याचा आरोप करत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अलका आत्राम यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सन्मान हा मागून मिळत नसतो, तो कर्तृत्वाने कमवावा लागतो, अशा शब्दांत आत्राम यांनी खासदारांना खडेबोल सुनावले असून, आदिवासी समाजाच्या वतीने त्यांचा तीव्र निषेध केला आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आणि विविध संघटनांच्या आग्रहास्तव राणी हिराई यांचा भव्य गौरव सोहळा चंद्रपुरात थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या भाषणावरून आता नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. अलका आत्राम म्हणाल्या की, कोणाचाही अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता, परंतु खासदारांचा केवळ ‘इगो हर्ट’ झाला आहे. तुम्ही खासदार झाल्यापासून महिलांसाठी नक्की काय केले? जिल्ह्यात महिलांवर अत्याचार झाले तेव्हा तुम्ही साधी भेट द्यायलाही फिरकला नाहीत. संसदेत महिला विधेयकाला विरोध करताना तुम्हाला महिलांची आठवण आली नाही, मग आताच पुळका कसा आला? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
Nitin Raut : नितीन राऊतांना धक्का; महापालिकेत केतन ठाकरे झाले ‘स्वीकृत’
या वादाला गेल्या काही दिवसांतील घडामोडींची पार्श्वभूमी आहे. चंद्रपूरच्या राजकारणात सुधीर मुनगंटीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील कलह सर्वश्रुत आहे. यापूर्वीही विकासकामांच्या श्रेयवादावरून आणि स्थानिक प्रशासकीय बैठकींमधील प्रोटोकॉलवरून दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राणी हिराई यांच्या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न खासदारांनी केल्याचा दावा भाजप गोटातून केला जात आहे.
आदिवासी समाजाने मोठ्या मनाने तुम्हाला कार्यक्रमात आमंत्रित करून तुमचा सन्मान केला, मात्र तुम्ही केवळ राजकारण करून कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम केले, असे आत्राम यांनी नमूद केले. जर तुम्ही केवळ सुधीरभाऊंना टार्गेट करण्यासाठी अशा क्लृप्त्या लढवत असाल, तर खबरदार! भाजप आणि आदिवासी समाज हे कधीही खपवून घेणार नाही. राजमाता राणी हिराई यांच्या बलिदानाचा हा अवमान असून, खासदारांची ही दुतोंडी भूमिका आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. खासदारांच्या या वागणुकीमुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
राणी हिराई यांनी आदिवासी समाजासाठी आपले बलिदान दिले. त्यांना मात्र आजवर कधी सन्मान दिला नाही. आम्ही सुधीरभाऊ यांना निवेदन दिले, विनंती केली. त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे शासनाच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. सुधीरभाऊ व्यस्त होते. ते कार्यक्रमाला येणार नव्हते. मात्र आम्ही आग्रह केला.ते आले तेव्हा खासदार यांचे भाषण सुरू होते. यात त्यांचा अपमान करायचा कोणाचा हेतू नव्हता. मात्र खासदारांनी मुद्दाम याचा राजकीय इशू केला असेही आत्राम म्हणाल्या.








