Gaju Kubde is known to almost everyone as a patient friend : गजू कुबडे हे रुग्णमित्र म्हणून जवळपास सर्वांनाच परिचित आहेत
Wardha : एखाद्या गरजू रुग्णाच्या नातेवाइकांचा फोन आला की स्वतःच्या दुचाकीला किक मारून पळणाऱ्या मित्राला, त्याच्या मित्रांनी वर्गणी जमा करून कार भेट दिली. या पठ्ठ्याने त्याला भेट मिळालेली कार विकून जुनी रुग्णवाहिका विकत घेतली. आता त्याने नि:शुल्क सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.
ही कृती रुग्णसेवक म्हणून ओळख असलेल्या हिंगणघाट येथील गजू कुबडे यांनी केली. हिंगणघाट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे दररोज अपघात होतात. अपघातानंतर रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विलंब झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे रुग्णवाहिकेने अपघातग्रस्तांना अपघात रुग्णालयापर्यंत विनामूल्य, तर अत्यंत गरीब परिवारातील रुग्णांना सेवाग्राम, सावंगी व वर्धा येथील रुग्णालयात सेवा नि:शुल्क सेवा देता यावी, यासाठी कुबडेंनी प्रयत्न चालवले होते. आता त्यांच्या प्रयत्नाला आता मूर्त रूप येणार आहे.
Prataprao Jadhav : स्वच्छता ठेवा आणि प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक द्या!
गजू कुबडे हे रुग्णमित्र म्हणून जवळपास सर्वांनाच परिचित आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या मित्रपरिवार तसेच कार्यकर्त्यांकडून वर्गणी गोळा करून त्यांना जुनी कार भेट दिली होती. या कारचा वापर लोकहितार्थ व्हावा, अशी भावना गजू कुबडे यांनी कार्यकर्त्यांकडे बोलून दाखविली होती. त्यावर सर्वांनी संमती दिल्याने ही कार विकून रुग्णवाहिका विकत घेण्यात आली.
जुन्या रुग्णवाहिकेत दुरुस्तीचे काम असल्याने तिला नवीन लूक देण्यासाठी ती गॅरेजमध्ये उभी करण्यात आली आहे. लवकरच ही रुग्णवाहिका गरजू गोरगरीब रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. अपघातातील जखमींना वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यात न आल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचे मी डोळ्यांनी पाहिले. गरजू रुग्णांना नि:शुल्क दवाखान्यात पोहोचविण्याची जबाबदारी रुग्णमित्र म्हणून मी स्वतः घेणार आहे, असे गजू कुबडे यांनी सांगितले.








