baramati-byelection-2026-sunetra-pawar-record-victory-highest-margin-india :“बारामतीत इतिहासाचा महाविजय; विरोधकांची दारुण पडझड”
Baramati: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक निकाल लागला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी देशातील सर्वाधिक मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. संपूर्ण मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवार तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या प्रचंड फरकाने विजयी झाल्या असून, हा विजय केवळ बारामतीपुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे.
या विजयाने सुनेत्रा पवार यांनी स्वतः अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेल्या विक्रमी मताधिक्यालाही मागे टाकत नवा इतिहास रचला आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघातून २०२२ मध्ये सुनील कुमार शर्मा यांनी २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजय मिळवला होता, मात्र सुनेत्रा पवार यांनी तो विक्रम मोडीत काढत देशातील सर्वाधिक मताधिक्याचा मान आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी नोएडाचे पंकज सिंह आणि शिरपूरचे काशीराम पावरा यांचेही विक्रम उल्लेखनीय होते, मात्र बारामतीतील या निकालाने सर्व रेकॉर्ड मागे टाकले आहेत.
या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवाराला हजार मतांचा टप्पाही गाठता आला नाही. करुणा मुंडे यांना केवळ १२५ मते मिळाली, तर अभिजित बिचुकले यांना १२१ मते मिळाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी सुनेत्रा पवार यांना दिलेला पाठिंबा आणि पवार कुटुंबावरील बारामतीकरांचा विश्वास यामुळे हा विक्रमी विजय शक्य झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या विजयानंतर पार्थ पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना बारामतीकरांचे आभार मानले. त्यांनी हा आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले, मात्र कुणीही जल्लोष करू नये असे आवाहन केले. तसेच आचारसंहिता संपल्यानंतर जनता दरबार घेणार असून, लोकांसाठी काम करण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वतः सुनेत्रा अजित पवार यांनीही आपल्या प्रतिक्रियेत हा विजय आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित असल्याचे म्हटले आहे. बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी हा शेवट नसून नव्या बारामतीच्या उभारणीची ही सुरुवात असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आणि कोणत्याही प्रकारचा जल्लोष टाळण्याचे आवाहन करत त्यांनी दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करण्याची विनंती केली आहे.
बारामतीतील या विक्रमी निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत असून, पवार कुटुंबाचा प्रभाव अधोरेखित झाला आहे. हा निकाल केवळ एक निवडणूक विजय नसून जनतेच्या भावनिक आणि राजकीय एकजुटीचे प्रतीक म्हणून पाहिला जात आहे.
___








