ashish-shelar-three-big-decisions-after-pm-modi-appeal-petrol-diesel-work-from-home : ‘कान्स’ दौरा रद्द ते ऑनलाइन बैठकांचा निर्णय, तीन मोठे आदेश जाहीर
Mumbai : मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत आणि खर्च नियंत्रणाचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर राज्यातील माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी तातडीने तीन महत्त्वाचे निर्णय जाहीर करत आपल्या विभागात काटकसरीची अंमलबजावणी सुरू केली आहे. ‘देशहितासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे’ असे सांगत शेलार यांनी सरकारी कामकाजातही बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
आशिष शेलार यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर असलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यानुसार आमच्या विभागाने काही तातडीचे निर्णय घेतले आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी जाणे टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या वापरातील वाहनांमध्ये शक्य तितक्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाईल. तसेच उद्यापासून विभागाच्या बहुतांश बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील.”
Devendra fadnavis : “वेळ ओळखा, इंधन जपून वापरा”, जनतेला मुख्यमंत्र्यांचे आवाहन
शेलार यांनी पुढे सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होत आहे. आयात-निर्यातीवर त्याचा परिणाम होत असून, भारतासारख्या देशांनी यावेळी सावध भूमिका घेणे आवश्यक आहे. परकीय चलनावरील दबाव कमी करण्यासाठी अनावश्यक खर्च आणि आयात मर्यादित ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
“देश हे आपले कुटुंब आहे. घरात अडचण आली तर आपण खर्च कमी करतो, त्याचप्रमाणे देशासमोरील संकटाच्या काळातही काही गोष्टींमध्ये संयम ठेवणे आवश्यक आहे. बाहेर फिरणे, इंधनाचा वापर आणि अनावश्यक खर्च यावर नियंत्रण ठेवले पाहिजे,” असेही आशिष शेलार म्हणाले.
Rahul gandhi : मोदींच्या ‘त्याग मंत्रा’वर राहुल गांधींचा पलटवार
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील जनसभेत देशवासियांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे, मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ऑनलाइन बैठकींना प्राधान्य देणे, पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळणे आणि परकीय उत्पादनांची खरेदी कमी करणे, अशी अनेक आवाहने त्यांनी केली होती.
पंतप्रधानांच्या या विधानांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका करत हे सरकारच्या अपयशाचे लक्षण असल्याचे म्हटले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. “राहुल गांधी यांच्या अज्ञानाचे हे पुरावे आहेत. देश सातत्याने प्रगती करत असताना त्यांना पोटदुखी होत आहे. जगभरात संकट निर्माण झाले असताना जबाबदार भूमिका घेण्याऐवजी ते राजकारण करत आहेत,” अशी टीका शेलार यांनी केली.
PM Modi : ‘हायब्रिड वर्क मॉडेल’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’चा मोदी मंत्र !
खतांच्या किंमतींचा उल्लेख करत शेलार म्हणाले की, “जगभरात खताची पोती सुमारे ३ हजार रुपयांना विकली जात आहेत. मात्र भारत सरकार तीच खताची पोती भारतीय शेतकऱ्यांना सुमारे ३०० रुपयांत उपलब्ध करून देत आहे. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे असूनही केंद्र सरकारने देशातील पुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवली आहे.”
याचवेळी आशिष शेलार यांनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’चाही उल्लेख केला. परकीय आक्रमणांनंतरही देशाच्या जनतेने संघर्ष करत सोमनाथ मंदिराचे अस्तित्व टिकवून ठेवले, हा भारतीय स्वाभिमानाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पूजा-अर्चना करून या पर्वाची सुरुवात केल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर राज्य सरकारमधील मंत्र्यांनीही ऊर्जा बचत, ऑनलाइन कामकाज आणि खर्च नियंत्रणाबाबत पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत असून, येत्या काही दिवसांत केंद्र आणि राज्य सरकारकडून आणखी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








