Tum to thehre pardesi lyricist died in Nagpur : मोमीनपुरा येथे घेतला अखेरचा श्वास, अत्यंत गरिबीत जगले आयुष्य
Nagpur ९० च्या दशकात आपल्या लेखणीने संपूर्ण देशाला वेड लावणारे आणि ‘तुम तो ठहरे परदेसी’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम यांचे आज नागपुरात निधन झाले. नागपूरच्या मोमीनपुरा भागातील एका अत्यंत साध्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, एका अजरामर गाण्याच्या जनकाचा प्रवास अत्यंत गरिबी आणि उपेक्षेत थांबल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जहीर आलम यांचा जीवनप्रवास हा थक्क करणारा आणि तितकाच वेदनादायी राहिला आहे.
सुरुवातीला नागपूरच्या प्रसिद्ध एम्प्रेस मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करणाऱ्या जहीर आलम यांच्यावर मिल बंद पडल्यानंतर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. मात्र, अशाही परिस्थितीत त्यांच्यातील कवी मनाची प्रतिभा कमी झाली नाही. त्यांनी लिहिलेले ‘तुम तो ठहरे परदेसी’ हे गाणे सुरुवातीला स्थानिक स्तरावर कव्वाली म्हणून गायले जायचे. पुढे गायक अल्ताफ राजा यांच्या आवाजात जेव्हा हे गाणे अल्बमच्या माध्यमातून जगासमोर आले, तेव्हा प्रसिद्धीचे सर्व विक्रम मोडीत निघाले. या गाण्याने संगीत कंपन्यांना आणि गायकांना कोट्यवधींची कमाई करून दिली, परंतु दुर्दैवाने या गाण्याचे मूळ लेखक असलेल्या जहीर आलम यांच्या पदरी मात्र केवळ उपेक्षा आणि अल्प मानधनच आले.
Nana patole : पंतप्रधानजी, काटकसरीचे डोस पाजण्यापूर्वी स्वतःपासून सुरुवात करा
जगाला आपल्या गीताने थिरकायला लावणाऱ्या या गीतकाराने आपले संपूर्ण आयुष्य नागपुरातील एका छोट्याशा खोलीत संघर्षात व्यतीत केले. त्यांच्या शब्दांनी अनेकांचे नशीब पालटले, पण जहीर आलम शेवटपर्यंत गरिबीशीच लढत राहिले. संगीत क्षेत्रातील या अवलियाच्या जाण्याने नागपूरच्या मातीतील एक महान कलाकार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ज्या गाण्याने इतिहास घडवला, त्या गाण्याचा रचयिता आज जगाचा निरोप घेताना रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी सोडून गेला आहे.








