व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sunetra pawar : राष्ट्रवादीत राष्ट्रीय कार्यकारिणीवरून खळबळ; प्रफुल पटेल, तटकरे यांची नावं...

Sunetra pawar : राष्ट्रवादीत राष्ट्रीय कार्यकारिणीवरून खळबळ; प्रफुल पटेल, तटकरे यांची नावं गायब !

sunetra-pawar-on-ncp-national-executive-list-praful-patel-sunil-tatkare-name-missing-controversy : सुनेत्रा पवारांकडून ‘तांत्रिक चूक’ असल्याचा खुलासा

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नव्या यादीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत पक्षातील महत्त्वाचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची नावं नसल्याचे समोर आल्यानंतर विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली. सोशल मीडियावर ही यादी वेगाने व्हायरल होत असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुढे येत या यादीत तांत्रिक आणि लिपिकीय चुका झाल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २९ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची सविस्तर माहिती सादर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रसारमाध्यमांमध्ये समोर आलेल्या पत्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव नमूद करण्यात आले असून जनरल सेक्रेटरी पदावर पार्थ पवार आणि जय पवार यांचा समावेश असल्याचे दिसून आले. मात्र पक्षातील वरिष्ठ आणि प्रभावी नेत्यांची नावं यादीत नसल्याने पक्षांतर्गत मोठे बदल सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले.

विशेषतः प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या अनुभवी नेत्यांची नावं कार्यकारिणीतून गायब झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील विधानसभा समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या यादीकडे महत्त्वाच्या राजकीय संकेतांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या पिढीला संधी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का, याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत.

या सर्व घडामोडींनंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तांत्रिक चूक असल्याचे म्हटले. संबंधित चुका लवकरच दुरुस्त करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केल्याने पक्षाने सध्या तरी नुकसान नियंत्रणाचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. मात्र या स्पष्टीकरणानंतरही राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही.

Bollywood news : ‘तुम तो ठहरे परदेसी…’ या अजरामर गीताचे गीतकार जहीर आलम यांचे नागपुरात निधन

दरम्यान, बारामतीच्या भविष्यातील राजकारणावरूनही पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीची हालचाल अधिक चर्चेत आली आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ असा संघर्ष पाहायला मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जरी सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी सार्वजनिकरीत्या पवार कुटुंब एकत्र असल्याचे सांगितले असले, तरी स्थानिक पातळीवरील हालचाली वेगळे संकेत देताना दिसत आहेत.

शरद पवार गटाचे युगेंद्र पवार सध्या बारामती मतदारसंघात सक्रिय झाले असून ते नियमित दौरे, गाठीभेटी आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यावर भर देताना दिसत आहेत. लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्यालाच बारामतीकर साथ देतील, असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Nana patole : पंतप्रधानजी, काटकसरीचे डोस पाजण्यापूर्वी स्वतःपासून सुरुवात करा

दुसरीकडे जय पवार यांनीही बारामतीत आपली उपस्थिती वाढवण्यास सुरुवात केली आहे. विविध कार्यक्रम, जनता दरबार आणि नुकसानीच्या भागांची पाहणी करत ते मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याशिवाय कर्जत-जामखेडमध्ये स्वतःचे स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केलेले रोहित पवार यांच्याबाबतही बारामतीतून भविष्यातील राजकीय एन्ट्रीच्या चर्चा सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून निर्माण झालेला वाद हा केवळ तांत्रिक चूक म्हणून संपतो की त्यातून पक्षातील भविष्यातील सत्तासंघर्षाचे संकेत समोर येतात, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!