Path cleared for a property tax hike; government lifts the stay : अमरावतीकरांवर कराचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता; २० ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत निर्णय
Amravati विधानसभा निवडणुकीपूर्वी अमरावती महानगरपालिकेच्या २०१४ मधील वाढीव मालमत्ता कराला राज्य शासनाने दिलेली स्थगिती अखेर उठविण्यात आली आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर राज्य शासनाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांनी १० ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या नावे पत्र जारी केले. ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या पत्रान्वये मालमत्ता कराला देण्यात आलेली स्थगिती आता उठविण्यात येत असल्याचे या पत्रातून स्पष्ट झाले आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे महापालिका प्रशासनाला वाढीव मालमत्ता कराच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात अमरावतीकरांवर वाढीव कराचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
काय आहे पार्श्वभूमी?
सन २०१४ मध्ये अमरावती महानगरपालिकेने शहरातील मालमत्तांवर वाढीव कर आकारणी केली होती. या वाढीव मालमत्ता कराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या विरोधाची दखल घेत तत्कालीन आमदार सुलभा खोडके यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर वाढीव मालमत्ता कराला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता.
नवनियुक्त नगरसेवकांसमोर आव्हान
आता विधानसभा तसेच महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्याने शासनाने स्थगिती उठवली आहे. त्यामुळे वाढीव मालमत्ता कराच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. कराचा विषय आधीपासूनच नागरिकांच्या नाराजीचा केंद्रबिंदू राहिला असल्याने प्रशासनाच्या निर्णयानंतर नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, नवनियुक्त नगरसेवकांसमोरही या विषयावर नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात आता मुख्यमंत्रीच बिग बॉस; नव्या अधिसूचनेमुळे महायुतीत खळबळ
२० ऑगस्टच्या सभेत निर्णय
शासनाने स्थगिती उठवल्यानंतर वाढीव मालमत्ता कराच्या पुनर्मूल्यांकनाचा विषय २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णयार्थ ठेवण्यात येणार आहे. सभेत सत्ताधारी आणि विरोधक कोणती भूमिका घेतात, तसेच कर आकारणीबाबत पुढील निर्णय काय होतो, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.
‘नागरिकांवर अतिरिक्त भार पडू देणार नाही’
वाढीव मालमत्ता करावरील स्थगिती उठविल्यानंतर आमदार रवी राणा यांनी नागरिकांवर अतिरिक्त कराचा भार पडू न देण्याची भूमिका मांडली आहे.
OBC Reservation : १५ जिल्ह्यांतील ओबीसी आरक्षणाला कात्री; खुल्या प्रवर्गातील पदे वाढली
“महानगरपालिका क्षेत्रातील २०१४ च्या वाढीव मालमत्ता करावरील स्थगिती राज्य शासनाने उठवल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मालमत्ता कराच्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट चर्चा करणार असून, अमरावती शहरातील जनतेवर कराचा कोणताही अतिरिक्त भार पडू देणार नाही. राज्यात आणि महापालिकेत महायुतीची सत्ता आहे,” असे आमदार रवी राणा यांनी सांगितले.








