India is in safe hands of Narendra Modi, bawankule targets opponents : महात्मा गांधी यांनी सुद्धा देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्वदेशीचा मंत्र दिला होता, विरोधकांना टोमणा
Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या काटकसरीच्या सल्ल्यावरून आणि स्वदेशीच्या आवाहनावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. विरोधकांकडून या आवाहनाचा संबंध आर्थिक संकटाच्या चाहूलशी लावला जात असतानाच, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. देशाची अर्थव्यवस्था आणि सुरक्षा नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली पूर्णपणे सुरक्षित असून, केवळ जागतिक परिस्थितीचा विचार करून त्यांनी स्वदेशीचा नारा दिला आहे, असे ठाम प्रतिपादन बावनकुळे यांनी आज येथे केले.
या संदर्भात भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की, स्वदेशीचा जागर ही काही नवीन संकल्पना नाही; खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुद्धा देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्वदेशीचा मंत्र दिला होता. देशाची संपत्ती देशातच राहावी आणि भारत आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावा, हाच हेतू यामागे आहे. त्यामुळे मोदींच्या आवाहनात काहीही चुकीचे नसून विरोधक केवळ राजकीय हेतूने गदारोळ करत आहेत. सोन्याच्या खरेदीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, विदेशात आपले धन जाऊ नये आणि देशांतर्गत बाजारपेठ मजबूत व्हावी, यासाठीच हा सल्ला देण्यात आला आहे.
NEET 2026 : नीट परीक्षा रद्द; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इंधन आणि ऊर्जा संकटाच्या चर्चांवर बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, आपल्याकडे सौर ऊर्जेसारखे मुबलक पर्याय उपलब्ध आहेत आणि सरकार त्या दिशेने पावले टाकत आहे. विमान प्रवासासाठी राज्य शासनाची परवानगी घेण्याचे बंधन हे केवळ नियोजनाचा भाग असून, विरोधकांनी याचा बाऊ करू नये. राहुल गांधी हे ‘रिजेक्टेड’ नेते असल्याचा टोला लगावत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे समर्थन केले. विरोधक कितीही आरोप करत असले, तरी भाजप सुरुवातीपासूनच स्वदेशीचा पुरस्कर्ता राहिला आहे. मोदीजींचा हा निर्णय देशाला आगामी काळात अधिक सक्षम बनवणारा ठरेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.








