neet-paper-leak-cbi-investigation-nashik-shubham-pune-dhananjay : सीबीआयचा तपास, लाखोंच्या व्यवहाराचा धक्कादायक खुलासा
New Delhi : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेले नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आता अधिक गंभीर बनले असून या प्रकरणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्रातील नाशिक आणि पुण्यापर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI ने या प्रकरणात संशयित असलेल्या नाशिकच्या शुभम खैरनारला ताब्यात घेत मध्यरात्री मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांकडून शुभमचा ताबा घेतल्यानंतर CBI अधिकाऱ्यांनी त्याची उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी केली. या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनंतर तपास यंत्रणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकचा शुभम खैरनार आणि पुण्यातील धनंजय नावाच्या तरुणाने मिळून नीट पेपरफुटीचा संपूर्ण कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. धनंजयने कथितरित्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका शुभमला तब्बल १० लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर शुभमने हीच प्रश्नपत्रिका टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुमारे १५ लाख रुपयांना पुढे विकल्याचा आरोप तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. या व्यवहारानंतर प्रश्नपत्रिका काही मिनिटांत विविध ग्रुप्समध्ये पसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Gold silver import : सोने-चांदीवरील कस्टम ड्यूटी पुन्हा १५ टक्क्यांवर
या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरेही उघड होत आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पेपर हरियाणापर्यंत पोहोचवण्यात आला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे राज्यांच्या पलीकडे कार्यरत असलेले मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुभम आणि धनंजय यांनी यापूर्वीही काही गटांना प्रश्नपत्रिका फॉरवर्ड केल्याचा संशय असून ती प्रश्नपत्रिका सुमारे ८० टक्के अचूक असल्याचे तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, विशेष तपास पथकाने कथितरित्या फुटलेल्या नमुना प्रश्नपत्रिका मिळालेल्या १५० विद्यार्थ्यांची आणि ७० पालकांची यादी CBI कडे सुपूर्द केली आहे. याशिवाय, या प्रकरणात ताब्यात असलेल्या १३ एमबीबीएस समुपदेशकांनाही चौकशीसाठी CBI च्या हवाली करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा व्याप आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे पोलिसांकडूनही या प्रकरणात समांतर तपास सुरू करण्यात आला आहे. नाशिकमधून अटक करण्यात आलेल्या आरोपीचा एक साथीदार पुण्यात लपून बसल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संबंधित तरुण हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले असून मंगळवार दुपारपासून त्याचा मोबाईल बंद असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. पुणे पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे.
दरम्यान, नीट परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम आणि तणाव निर्माण झाला आहे. ३ मे रोजी झालेल्या या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली होती. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आपल्या गावी परतले होते, तर काही विद्यार्थी सुट्ट्यांसाठी बाहेर गेले होते. मात्र परीक्षा रद्द झाल्यानंतर आता पुन्हा परीक्षा कधी होणार, पुढील प्रक्रिया काय असेल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कसे वाचवले जाणार, याबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.
तपास यंत्रणांच्या मते, या प्रकरणात सोशल मीडिया आणि खासगी मेडिकल काऊन्सलिंग नेटवर्कचा वापर करून मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण करण्यात आली. आरोपींनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असून आगामी काळात या प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.








