Cashbook for 2024–25 missing from Shindi Gram Panchayat; audit team returned empty-handed : निलंबित ग्रामसेवकाने चार्ज न दिल्याने अडथळा; भ्रष्टाचाराची लपवाछपवी तर नाही ना?
Sakharkherda सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील ग्रामपंचायतीच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी (ऑडिट) आलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागल्याची खळबळजनक घटना ११ मे रोजी घडली. ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दस्तऐवज असलेले ‘कॅशबुक’ उपलब्ध नसल्याने हा प्रकार घडला असून, यासाठी तत्कालीन निलंबित ग्रामसेवकाचा आडमुठेपणा कारणीभूत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
शासकीय नियमानुसार ग्रामपंचायतीच्या जमा-खर्चाचे लेखापरीक्षण करण्यासाठी सोमवारी ऑडिट अधिकारी गणेश साबळे व सागर बोकडे हे शिंदी येथे दाखल झाले होते. मात्र, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे कॅशबुकच त्यांच्यासमोर सादर करण्यात आले नाही. ऑडिटसाठी कॅशबुक हा मुख्य आधार असतो. तोच उपलब्ध नसल्याने ऑडिट पथकाने काम थांबवून तेथून काढता पाय घेतला.
याबाबतचे पत्र ग्रामपंचायत अधिकारी अनंता इंगळे यांना देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “मी सध्या कॅशबुक देऊ शकत नाही. मला आणखी आठ दिवसांचा कालावधी द्या,” असे सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शिंदी ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक सध्या निलंबित आहेत. त्यांच्या जागी नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, निलंबित ग्रामसेवकाने अद्यापही रीतसर पदभार (चार्ज) नवीन ग्रामसेवकाकडे सोपवलेला नाही.
चार्ज न दिल्याने कॅशबुकसह अनेक महत्त्वाच्या फाईल्स सध्या कुठे आहेत, याचा ठावठिकाणा नाही. एका निलंबित कर्मचाऱ्याच्या मुजोरीमुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महत्त्वाची कागदपत्रे आणि कॅशबुक वेळेवर उपलब्ध न होण्यामागे काही मोठे गौडबंगाल दडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील विकासकामांच्या निधीत काही गैरव्यवहार झाला आहे का? तसेच तो लपवण्यासाठीच कॅशबुक जाणीवपूर्वक गायब ठेवले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गटविकास अधिकारी काय कारवाई करणार?
एकीकडे ग्रामविकासाच्या गप्पा मारल्या जात असताना शिंदी ग्रामपंचायतीत दस्तऐवजाअभावी प्रशासकीय अडथळा निर्माण झाला आहे. आता या प्रकरणी सिंदखेडराजाचे गटविकास अधिकारी (BDO) संबंधित निलंबित ग्रामसेवकावर कठोर कारवाई करून कॅशबुक व इतर रेकॉर्ड ताब्यात घेणार का, याकडे शिंदीकरांचे लक्ष लागले आहे.
“संबंधित ग्रामसेवक दिनांक २ जानेवारी रोजी निलंबित झाला असून, त्यानंतर तात्पुरता चार्ज उमनगाव येथील ग्रामसेवकांकडे देण्यात आला होता. त्यानंतर अतिरिक्त चार्ज अनंता इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. चार्जपट्टी तपासून योग्य ती कारवाई करण्यात येईल,” असे सिंदखेडराजाचे गटविकास अधिकारी (वर्ग-१) अजित कुमार बांगर यांनी सांगितले.








