व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal Corporation : “नेते झाले झकास, अकोला शहर भकास”; मूलभूत सुविधांवरून...

Akola Municipal Corporation : “नेते झाले झकास, अकोला शहर भकास”; मूलभूत सुविधांवरून वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Vanchit Bahujan Aghadi stages protest at Akola Municipal Corporation over lack of basic amenities : पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा, मोकाट जनावरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

Akola शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून “नेते झाले झकास, अकोला शहर भकास” अशा घोषणा देत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत आंदोलन केले. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा आणि मोकाट जनावरांच्या प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे. काही परिसरांत अद्याप पाण्याची पाईपलाईनच पोहोचलेली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. विशेषतः प्रभाग क्रमांक १४ मधील शिवणी-मलकापूर परिसरात पाणी, स्वच्छता, रस्ते, नाल्या आणि स्ट्रीट लाईट यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. पावसापूर्वी नालेसफाईचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. तसेच घंटागाडी सेवा मोफत करून प्रत्येक घरापर्यंत नियमित कचरा संकलन करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून “रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फॉगिंग मशीन सुरू करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. “मच्छरांचा बंदोबस्त कधी होणार?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली.

Rahul Bondre, Bhilsingh Solanki : ‘राजा-रंक’ मैत्रीची पोस्ट; काँग्रेसच्या पोस्टमुळे असमानतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

दरम्यान, शहरात मोकाट कुत्रे आणि जनावरांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. कस्तुरबा गांधी रुग्णालयात कॅन्सर, किडनीसह गंभीर आजारांवरील उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच महानगरपालिका शाळा डिजिटल करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Honey Trap : शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून ७० लाखांची खंडणी; अमरावतीतील दांपत्याविरुद्ध गुन्हा

“जनता नियमित कर भरते, मात्र पाणी, स्वच्छता, रस्ते, लाईट आणि आरोग्य सुविधा मिळत नाहीत. सत्ताधारी एसीमध्ये मस्त आणि जनता सुविधांसाठी त्रस्त आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनात गटनेते निलेश देव, नगरसेवक सुनील इन्नानी, पराग गवई, शेख शमशु कमर साबीर, नगरसेविका जयश्री बहाद्दूरकर आणि उज्ज्वला पातोडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

error: Content is protected !!