neet-paper-leak-2026-cbi-investigation-shubham-khairnar-dhananjay-lokhande-news : नीट पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे
Mumbai: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात आता नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI च्या तपासात प्रश्नपत्रिकेची लाखो रुपयांत विक्री, टेलिग्रामद्वारे पेपरची देवाणघेवाण आणि विविध राज्यांमध्ये पसरलेले रॅकेट उघड होत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर बनली आहे. आतापर्यंत देशभरातून सहा आरोपींना अटक करण्यात आली असून अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे.
सीबीआय ने जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल, गुरुग्राममधून यश यादव, नाशिकमधून शुभम खैरनार आणि अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे यांना अटक केली आहे. या सर्व आरोपींविरोधात परीक्षा प्रश्नपत्रिका गळती, आर्थिक व्यवहार आणि विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
सीबीआयच्या तपासानुसार, नाशिकमधील शुभम खैरनार याने करिअर कौन्सिलिंगच्या नावाखाली वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे नेटवर्क तयार केले होते. पुण्यातून कुरिअरद्वारे प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर त्याने ती टेलिग्रामच्या माध्यमातून हरियाणात विकल्याचे समोर आले आहे. शुभम खैरनार हा बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून तो करिअर कौन्सिलर म्हणूनही कार्यरत होता. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, त्याने धनंजय लोखंडेकडून सुमारे 10 लाख रुपयांत प्रश्नपत्रिका खरेदी केली आणि पुढे गुरुग्राममधील मध्यस्थाला ती 15 लाख रुपयांत विकली.
धनंजय लोखंडे पुण्यात असताना त्याने कुरिअरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका शुभम खैरनारकडे पाठवल्याचा आरोप आहे. त्यानंतर टेलिग्रामवरून ही प्रश्नपत्रिका हरियाणातील नेटवर्कपर्यंत पोहोचवण्यात आली. या संपूर्ण व्यवहारात आणखी काही मध्यस्थ सहभागी असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील लातूर कनेक्शनचाही तपास वेगाने सुरू आहे. संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या खासगी क्लासेसची पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हस्तलिखित ‘गेस पेपर’चा उगम नेमका कुठून झाला, याचा शोध घेतला जात आहे. तक्रारीनुसार, या हस्तलिखित पेपरमधील अनेक प्रश्न NEET(UG)-2026 च्या प्रत्यक्ष परीक्षेत आले होते.
CBI ने शुभम खैरनारच्या नांदगाव येथील घरासह नाशिकमधील भाड्याच्या घरावरही छापे टाकले. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. शुभम खैरनारला दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याच्या कोठडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकरणात इतर आरोपींचाही सहभाग असू शकतो आणि त्यांचा शोध घेण्यासाठी आरोपींची कोठडी आवश्यक आहे.
तपासादरम्यान शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचाही मुद्दा समोर आला आहे. त्याचा भाऊ भावेश खैरनार यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. नंतर चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले.
दरम्यान, नीट 2026 परीक्षा रद्द करण्यामागील कारणांचाही तपासात मोठा खुलासा झाला आहे. राजस्थानमधील सीकर येथे परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना ‘गेस पेपर’ वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या गेस पेपरमध्ये तब्बल 410 प्रश्नांचा समावेश होता. त्यापैकी 120 ते 135 प्रश्न प्रत्यक्ष NEET परीक्षेत जशास तसे आल्याचा दावा करण्यात आला. विशेषतः रसायनशास्त्र विषयातील प्रश्नांमध्ये मोठे साधर्म्य आढळून आले. हे प्रश्न केवळ अचूक अंदाज होते की प्रत्यक्ष पेपरफुटी झाली होती, याची चौकशी केल्यानंतर प्राथमिक तपासातील निष्कर्ष पाहता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील या कथित घोटाळ्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीबीआय तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या रॅकेटमागील मोठे नेटवर्क उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








