ashok-kharat-kumbh-mela-ring-road-land-acquisition-three-crore-compensation-news : कुंभमेळा रिंगरोड भूसंपादनातून मिळणार तब्बल तीन कोटींचा सरकारी मोबदला
Nashik : नाशिकमध्ये दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेला भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिस कोठडीत आहे. आर्थिक गैरव्यवहारांच्या संशयामुळे अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवरही त्याचे नाव असल्याची चर्चा सुरू असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बाजूला गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अडकलेल्या अशोक खरातला कायदेशीर संकटांचा सामना करावा लागत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र सरकारी भूसंपादनातून त्याच्या कुटुंबाच्या खात्यात तब्बल कोट्यवधी रुपयांचा मोबदला जमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ‘कुंभमेळा रिंगरोड’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी शहरातील विविध भागांतील जमिनी संपादित केल्या जात असून त्यात अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनींचाही समावेश आहे. या भूसंपादन प्रक्रियेतून खरात कुटुंबाला सुमारे तीन कोटी रुपयांचा सरकारी मोबदला मिळणार असल्याची माहिती समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
माहितीनुसार, गवळणे शिवारातील जमिनीच्या बदल्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांना सुमारे ८२ लाख ८३ हजार रुपयांचा मोबदला मिळणार आहे. याशिवाय पाथर्डी शिवारातील भूसंपादनापोटी अशोक खरातच्या मुली तृप्तबाला खरात आणि सृष्टी खरात यांच्या नावे सुमारे १ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर होणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोठडीत असतानाही अशोक खरातच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण भूसंपादन प्रक्रियेत आणखी एका चर्चित नावाचा उल्लेख होत आहे. यापूर्वी विविध वादांमध्ये अडकलेले आणि सध्या निलंबित असलेले उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नीचे नावही या व्यवहाराशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित जमीन व्यवहारांमधून त्यांनाही लाखो रुपयांचा मोबदला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातूनही गंभीरतेने पाहिले जात आहे.
अशोक खरात सध्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात पोलिस कोठडीत असल्याने सरकारी खरेदी प्रक्रियेच्या वेळी त्याची प्रत्यक्ष उपस्थिती राहण्याची शक्यता कमी मानली जात आहे. मात्र, या व्यवहारासाठी त्याच्या मुली तृप्तबाला खरात आणि सृष्टी खरात सरकारी कार्यालयात उपस्थित राहू शकतात, अशी चर्चा प्रशासनातील सूत्रांकडून व्यक्त होत आहे. महिलांवरील अत्याचार, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या अशोक खरातला हा सरकारी मोबदला नियमानुसार मिळणार की तपास यंत्रणा या व्यवहारांवर पुढील कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.








