
maharashtra-vidhan-parishad-election-2026-schedule-seatwise-details : 18 जूनला मतदान, महायुती-मविआसाठी प्रतिष्ठेची लढत
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशनाआधी मोठी राजकीय हालचाल सुरू झाली असून विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या निवडणुकांकडे आता राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकांमुळे विधान परिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या 17 जागांपैकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्याने अनेक मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपूनही निवडणुका प्रलंबित राहिल्या होत्या. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून या जागा रिक्त होत्या.
Nitin gadkari : ‘१ रुपयाचं काम, १० रुपयांची पब्लिसिटी’; नितीन गडकरींचा राजकारण्यांना टोला
नियमांनुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येच्या किमान 75 टक्के मतदार उपलब्ध असतील तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. उर्वरित सदस्यांमध्ये 30 सदस्य विधानसभेतील आमदारांकडून, 7 पदवीधर मतदारसंघातून, 7 शिक्षक मतदारसंघातून तर 12 सदस्य राज्यपाल नियुक्त करतात.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 25 मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून असणार आहे. 2 जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर 4 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून 22 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
Uddhav thackeray : सभागृहात दांड्या, उद्धव ठाकरेंची 4 वर्षांत फक्त 42 दिवस हजेरी !
या निवडणुकीत सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभेतील विद्यमान संख्याबळ पाहता महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाकडे 131 आमदार, शिवसेना शिंदे गटाकडे 57, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 40, तसेच मित्रपक्षांसह महायुतीचे एकूण संख्याबळ 234 वर पोहोचले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 10, शिवसेना ठाकरे गटाचे 20, समाजवादी पक्षाचे 2 आणि अन्य एका आमदारासह एकूण 49 आमदारांचे संख्याबळ आहे. तर इतर पक्ष आणि अपक्ष मिळून 3 आमदार आहेत.
Bike taxi action : राज्यातील बेकायदा बाइक टॅक्सी सेवा पुन्हा चर्चेत
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती आपले वर्चस्व कायम ठेवण्याच्या तयारीत असताना महाविकास आघाडीकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत उमेदवारी, पक्षांतर्गत नाराजी, रणनीती आणि राजकीय समीकरणांमुळे महाराष्ट्राचे राजकारण आणखी रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
__








