Chairman and Vice-Chairman resign; stir in Sindkhed Raja Market Committee : सत्ता समीकरण बदलणार? आमदारांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
Sindkhedraja येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) सभापती अनिल तुपकर आणि उपसभापती विष्णू मेहेत्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ठरलेल्या सत्तासमीकरणानुसार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही राजकीय घडामोड घडली असून आता सभापती व उपसभापतीपदी कोणाला संधी मिळणार, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १०, भारतीय जनता पक्षाचे ४ आणि शिंदे शिवसेनेचे ४ असे एकूण १८ संचालक आहेत. तीन पक्षांमध्ये झालेल्या राजकीय समन्वयानुसार सभापतीपद शरद पवार राष्ट्रवादीकडे तर उपसभापतीपद आघाडीतील इतर घटक पक्षांना देण्याचा फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. त्यानुसार प्रथम सभापती म्हणून अनिल तुपकर, तर उपसभापती म्हणून विष्णू मेहेत्रे यांनी जबाबदारी सांभाळली.
गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीवर माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व राहिले आहे. या काळात समितीमध्ये नवीन वजनकाटा, संरक्षण भिंत, नवीन गोदामे, तसेच पूर्वी बंद पडलेले नाफेड केंद्र पुन्हा सुरू करण्यासारखी कामे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तूर, हरभरा व सोयाबीन खरेदी प्रक्रियेद्वारे बाजार समितीच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, बहुमत शरद पवार राष्ट्रवादीकडे असल्याने सभापतीपद पुन्हा त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मात्र, पुढील नेतृत्व निवडीत माजी आमदार तोताराम कायंदे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच माजी आमदार डॉ.शशीकांत खेडेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे.
Laxman Hake on OBC census : जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी एकजूट गरजेची; प्रा. लक्ष्मण हाके यांचे आवाहन
अडीच वर्षांपूर्वी प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून बाजार समितीतील सत्तासमीकरणाचा तिढा सोडविला होता. आता नव्या टप्प्यात कोणत्या गटाला संधी दिली जाते आणि नेतृत्वाचा फॉर्म्युला कसा ठरतो, यावर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा रंगू लागली आहे.








