Prof. Laxman Hake appeals for OBC unity for caste-based census : सोयंदेवपासून ओबीसी एल्गार सभांना प्रारंभ; राज्यभर १०० सभांचे अभियान
Sindkhedraja ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी, आरक्षण टिकून राहावे आणि समाजाचे राजकीय व सामाजिक प्रतिनिधित्व वाढावे, या मागण्यांसाठी ओबीसी समाजाने संघटित होण्याची गरज असल्याचे आवाहन प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले. सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव गावातून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या १०० एल्गार सभांच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
प्रा. हाके यांनी यावेळी बोलताना, जातनिहाय जनगणना नसल्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याचा दावा केला. बोगस ओबीसी प्रमाणपत्रांच्या आधारे काही व्यक्तींना लाभ मिळत असताना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत संधी पोहोचत नसल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती व विविध योजनांचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेदरम्यान उपस्थित काही वक्त्यांनी सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले. बटुळे बाबा यांनी सामाजिक सलोखा आणि प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर भाष्य करताना मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर टीका केली. त्यांनी ही मते स्वतःची असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी नवनाथ वाघमारे यांनी जातनिहाय जनगणनेमुळे ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व वाढू शकते, असे मत व्यक्त केले. तर विनोद वाघ यांनी समाजाच्या अस्तित्वाच्या प्रश्नांवर उभ्या राहणाऱ्या चळवळींना बळ देण्याची गरज अधोरेखित केली. डॉ. सुनील कायंदे यांनी प्रा. हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या कार्याची तुलना ऐतिहासिक लढवय्यांशी करत संघटनात्मक एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.
Fuel price hike : बैलगाडी, गाढव, घोडे अन् सायकल; इंधन दरवाढीचा अनोखा निषेध
सभेत “जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे”, “आरक्षण टिकले पाहिजे” आणि “ओबीसी प्रतिनिधित्व वाढले पाहिजे” अशा मागण्या मांडण्यात आल्या. ग्रामीण भागातील नागरिकांनी संघटित होऊन सामाजिक व राजकीय प्रश्नांवर सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.








