Sanjay Gaikwad under scrutiny; politics heats up over the ‘Shivaji Kon Hota?’ controversy : न्यायालयाच्या परवानगीनंतर राजकीय खळबळ; गायकवाड प्रकरणावर चर्चांना उधाण
Buldhana ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता न्यायालयीन टप्प्यावर पोहोचल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना वेग आला आहे. शिंदेसेनेचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीस न्यायालयाने परवानगी दिल्याची बाब समोर आल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून विरोधकांनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्याची चिन्हे आहेत.
पुस्तकाच्या संदर्भातील वाद, त्यानंतर झालेल्या कथित फोनवरील संतप्त प्रतिक्रिया आणि आता चौकशीची प्रक्रिया यामुळे हे प्रकरण केवळ सामाजिक वा वैचारिक न राहता थेट राजकीय पटलावर पोहोचले आहे. न्यायालयीन परवानगीनंतर विरोधी पक्षांना सत्ताधारी आमदारांवर टीका करण्यासाठी नवा मुद्दा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, शिंदेसेनेच्या स्थानिक पातळीवरही या घडामोडींवर पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
Sindkhedraja APMC : सभापती-उपसभापतींचे राजीनामे; सिंदखेडराजा बाजार समितीत खळबळ
दरम्यान, संबंधित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकीचे फोन येत असल्याचा दावा कायम असून, महिनाभरात शंभराहून अधिक फोन आल्याची माहिती पुढे आल्याने या प्रकरणाची संवेदनशीलता अधिक वाढली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनावरही कारवाईबाबतचा दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.
या सर्व घडामोडींमुळे आमदार गायकवाड यांच्या राजकीय अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात ते कोणती भूमिका घेतात आणि शिंदेसेना याबाबत काय अधिकृत भूमिका मांडते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.








