व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ncp meeting : तटकरेची नाराजी, पटेलांची गैरहजेरी, भुजबळांसोबत चकमक, राष्ट्रवादीत अस्वस्थता !

Ncp meeting : तटकरेची नाराजी, पटेलांची गैरहजेरी, भुजबळांसोबत चकमक, राष्ट्रवादीत अस्वस्थता !

hasan-mushrif-on-ncp-meeting-praful-patel-sunil-tatkare-internal-politics : बैठकीतील वादावर हसन मुश्रीफ म्हणतात “पेल्यातील वादळ पेल्यातच संपलं”

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या वादळी बैठकीनंतर पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना उधाण आले असताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी पहिल्यांदाच यावर सविस्तर भूमिका मांडली आहे. सुनील तटकरे यांनी बैठकीत व्यक्त केलेली नाराजी, प्रफुल पटेल यांची गैरहजेरी, छगन भुजबळांसोबत झालेली कथित शाब्दिक चकमक आणि पक्षातील वाढती अस्वस्थता या सर्व मुद्द्यांवर बोलताना मुश्रीफ यांनी “हे पेल्यातील वादळ असून ते पेल्यातच संपलं आहे” असे म्हणत परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल यांच्यावर सातत्याने होत असलेल्या टीकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील कुणीही आमच्या समर्थनासाठी पुढे आले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. तसेच, प्रत्येक वेळी टीकेचे लक्ष्य आम्हीच का व्हायचे, याबाबत वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

Mlc election : एकनाथ शिंदेंचा भाजपच्या ‘फॉर्म्युल्या’ला नकार, तोडग्यासाठी अमित शाहांच्या दरबारात हजेरी !

या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, तटकरे यांनी बैठकीत कोणतीही आक्रमक भूमिका घेतली नव्हती, तर केवळ त्यांना आणि प्रफुल पटेल यांना टार्गेट केलं जात असल्याची भावना त्यांनी मांडली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष एकसंध ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याच काळात काही नेत्यांवर सातत्याने आरोप होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली होती, असेही मुश्रीफ म्हणाले.

प्रफुल पटेल यांच्या बैठकीतील गैरहजेरीबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही मुश्रीफ यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. प्रफुल पटेल काही महत्त्वाच्या कामानिमित्त बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीचा वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सुनील तटकरे बोलत असताना छगन भुजबळ यांनी त्यांना चर्चा थांबवण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, “स्पष्टता येण्यासाठी मी बोलणारच” अशी भूमिका तटकरेंनी घेतल्याने बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे तटकरेंच्या भाषणापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती समोर आल्याने पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना आणखी बळ मिळाले.

Ncp meeting : देवगिरीत नाराजीचा ज्वालामुखी फुटला! तटकरे-भुजबळ वादाने राष्ट्रवादीत खळबळ

या बैठकीत १० जून रोजी होणाऱ्या पक्षाच्या स्थापना मेळाव्याबाबतही मोठी चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. हा मेळावा मुंबईत घ्यायचा की पुण्यात, यावरून पक्षातील विविध गटांमध्ये मतमतांतरे असल्याची चर्चा आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्थ खाते अद्याप राष्ट्रवादीकडे परत आले नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

याबाबत बोलताना हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, अर्थ खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच होते. बजेट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते खाते तात्पुरते दुसरीकडे ठेवण्यात आले होते. मात्र, योग्य वेळी ते पुन्हा राष्ट्रवादीकडे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असून या विषयावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल आणि भाजप राष्ट्रवादीचा सन्मान राखेल, असेही त्यांनी म्हटले.

महायुतीतील आगामी निवडणुकांबाबत बोलताना मुश्रीफ यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्रच निवडणुका लढवतील, असा दावा केला. प्रत्येक पक्ष आपली तयारी करत असतो, मात्र महायुती मजबूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sudhir Mungatiwar : नेत्यावरील प्रेमाची ‘शाश्वत’ पावती, चंद्रपुर जिल्ह्यातील कार्यकर्त्याने हातावर कोरले ‘सुधीरभाऊ मुनगंटीवार’ नाव

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांना मिळालेल्या हलाल सर्टिफिकेटवरून निर्माण झालेल्या वादावरही मुश्रीफ यांनी भूमिका मांडली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेषतः आखाती देशांमध्ये तूप, लोणी आणि दूध पावडर निर्यात करण्यासाठी अशा प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. हे सर्टिफिकेट २०२२ मध्येच घेण्यात आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जण मुद्दाम वाद निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबतही त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार असून चेअरमनपदही महायुतीकडेच राहील. सध्या मतदार याद्यांची प्रक्रिया सुरू असून सप्टेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली असली, तरी पक्षात कोणताही मोठा संघर्ष नसून सर्व मतभेद चर्चेतून मिटतील, असा दावा पक्ष नेतृत्वाकडून केला जात आहे.

__

error: Content is protected !!