Congress took strict action against two candidates who get back the candidatur: पक्षाशी गद्दारी करत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप
Nagpur विधान परिषदेच्या निवडणुकीतून पक्षनेतृत्वाला अंधारात ठेवून परस्पर माघार घेणे काँग्रेसच्या दोन अधिकृत उमेदवारांना चांगलेच महागात पडले आहे. पक्षाशी गद्दारी करत ऐनवेळी पाठीत खंजीर उपसणाऱ्या या दोन्ही उमेदवारांना काँग्रेस पक्षातून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल अशी हकालपट्टी करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे असून, त्यांच्या या ‘माघारनाट्या’मुळे महायुतीचे मार्ग मोकळे झाले आहेत.
यवतमाळ विधान परिषद मतदारसंघातून काँग्रेसने साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, माघारीच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांनी पक्षाच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्याला विश्वासात न घेता, साधी पूर्वकल्पनाही न देता आपला अर्ज मागे घेतला आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला. पुरेसे संख्याबळ नव्हते आणि जिंकण्याची शाश्वती नव्हती म्हणून माघार घेतल्याचा कांगावा कांबळे करत असले, तरी उमेदवारी अर्ज भरताना त्यांना संख्याबळ माहिती नव्हते का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी कांबळे यांनी माघार घेतली, त्याच वेळी काँग्रेसचे प्रमुख नेते त्यांची वाट पाहत बैठक घेऊन बसले होते आणि दुसरीकडे कांबळे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेत होते. कांबळे यांनी विरोधकांशी मोठी राजकीय तडजोड केल्याचा संशय आता बळावला असून, त्यांच्या या शरणागतीमुळे शिवसेना महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले आहेत.
Sudhir Mungatiwar: विधान परिषदेच्या आमदारांचा जनतेला काय फायदा? सुधीर मुनगंटीवार यांचा खडा सवाल
दुसरीकडे, अत्यंत चुरशीच्या मानल्या गेलेल्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनीही शेवटच्या क्षणी माघार घेत पक्षाचा घात केला. या मतदारसंघात भाजप महायुती आणि काँग्रेस महाआघाडीकडे विजयाची समान संधी होती. अपक्ष, दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भूमिका येथे निर्णायक ठरणार होती. हेच राजकीय समीकरण ओळखून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सुरुवातीला आपल्या मुलीसाठी चाचपणी केली होती, मात्र निवडणूक जाहीर होताच अनेक नगरसेवक अचानक गायब झाल्याने त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने शैलेश अग्रवाल यांच्यावर मोठा विश्वास दाखवत उमेदवारी दिली; परंतु अग्रवाल यांनी शेवटच्या दिवशी थेट रिंगणातून पळ काढल्याने भाजप महायुतीचे अरुण लखानी अविरोध निवडून आले.
Nagpur’s political heavyweight : नागपूरचे राजकीय वजन वाढले; जिल्हा आता 19 आमदारांचा
ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांनीच शरणागती पत्करल्याने काँग्रेसची राज्यभरात मोठी नाचक्की झाली आहे. या गंभीर दगाफटक्याची दखल घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल या दोघांच्याही निलंबनाचे आदेश जारी केले. तुमच्याच विनंतीवरून पक्षनेतृत्वाने विश्वास दाखवून विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. मात्र, तुम्ही पक्षनेतृत्वाला पूर्णपणे अंधारात ठेवून उमेदवारी मागे घेतली आणि पक्षाला अत्यंत अडचणीच्या स्थितीत आणून उभे केले. ही कृती अक्षम्य आहे, अशा कडक शब्दांत सपकाळ यांनी निलंबनाच्या आदेशात या दोन्ही नेत्यांवर आसूड ओढले आहेत. उमेदवारांच्या या धक्कादायक माघारीमुळे विदर्भातील काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि तडजोडीचे राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.








