व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rajya sabha seat : भुजबळ आघाडीवर तर नवनीत राणा, ठाकरे गटाच्या माजी...

Rajya sabha seat : भुजबळ आघाडीवर तर नवनीत राणा, ठाकरे गटाच्या माजी खासदाराच्या नावाचीही चर्चा !

ncp-rajya-sabha-seat-chhagan-bhujbal-navneet-rana-praful-patel-meeting : राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवारीवर खलबतांना वेग; प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी बैठक

Mumbai : राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभेच्या जागेसाठी अद्याप उमेदवार निश्चित झालेला नसताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी देशभरातील २४ रिक्त जागांसह महाराष्ट्रातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १८ जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Chandrashekhar bawankule: संख्याबळ नव्हते तर कशाला उड्या मारल्या?; बावनकुळेंचा काँग्रेसला ‘मिरची’ झोंबणारा टोला

पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. ओबीसी समाजातील प्रमुख नेतृत्व म्हणून त्यांचा अनुभव आणि राजकीय वजन लक्षात घेता पक्ष नेतृत्व त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, माजी खासदार नवनीत राणा यांच्याही नावाची चर्चा रंगली आहे. राज्यसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

मात्र, विचारधारात्मक कारणांमुळे नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.

Raj thackeray : मराठी जनतेने मिरवणुकांच्या पलीकडे जाऊन शिवरायांचा वारसा स्मरावा !

याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एका माजी खासदाराकडूनही राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र संबंधित इच्छुकाला पक्षाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे समजते. त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीबाबतची उत्सुकता कायम राहण्याची शक्यता आहे.

प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीला पार्थ पवार, मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध नावांवर चर्चा सुरू असून उद्या सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आणखी एक महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते.

Vijay waddetiwar : आमच्याच एका नेत्याने पैसे वाटले, वडेट्टीवारांच्या आरोपाने खळबळ

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेली सोशल मीडिया पोस्टही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेची रिक्त जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच असल्याचे नमूद करत इतरांनी त्या जागेवर दावा करू नये, असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. तसेच पक्षात अंतिम निर्णय हा नेतृत्वाकडूनच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छगन भुजबळ यांना संधी मिळणार की अखेरच्या क्षणी एखादे नवे नाव समोर येणार, याबाबतचा निर्णय पुढील काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

_

error: Content is protected !!