Chandrashekhar bawankule targets congress on legislative election strategy failure: बावनकुळे म्हणतात, काँग्रेसला आधीच इशारा दिला होता, पण आमचा सल्ला ऐकला नाही
Nagpur राज्यात काँग्रेसकडे संख्याबळ नव्हते, हे माहिती असूनही त्यांनी उगीचच शड्डू ठोकले आणि शेवटी विदर्भातील उमेदवारांनीच पक्षाला तोंडघशी पाडत ऐनवेळी माघार घेतली. आम्ही आधीच सांगितले होते की उगाच नामुष्की अंगावर ओढवून घेऊ नका, पण ऐकेल ती काँग्रेस कसली अशा बोचऱ्या आणि शेलक्या शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागा बिनविरोध झाल्या असून, यात विदर्भातील दोन जागांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेसच्या या लाजिरवाण्या माघारीवरून विरोधकांचे चांगलेच वाभाडे काढले.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, निवडणूक अर्ज सादर करण्यापूर्वीच मी काँग्रेसला संख्याबळाचा विचार करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. भाजप महायुतीकडे तब्बल ७० टक्के मते असल्याने आमचा विजय आधीच निश्चित होता. त्यामुळे उगाच टंचाईच्या काळात इंधन आणि पैशाचा अपव्यय करू नका, असा सल्ला आम्ही विरोधकांना दिला होता. निवडणूक जाहीर झाल्यानंतर महिनाभर आचारसंहिता असते, १५ दिवस प्रचार करावा लागतो. आमच्याकडे बहुमत नसते तर आम्ही स्वतः निवडणूक लढणे टाळले असते. सध्याची परिस्थिती संपूर्णपणे आमच्या बाजूने असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना आम्ही निवडणूक न लढण्याची विनंती केली होती, मात्र त्यांनी ती फेटाळली आणि सर्वच ठिकाणी उमेदवार उभे केले. आता त्यांच्याच उमेदवारांनी वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात पक्षाला कोणताही सुगावा लागू न देता परस्पर माघार घेऊन धक्का दिला आहे.
Raj thackeray : मराठी जनतेने मिरवणुकांच्या पलीकडे जाऊन शिवरायांचा वारसा स्मरावा !
ऐनवेळी उमेदवार पळाल्याने तोंड लपवण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला सल्ला देताना बावनकुळे म्हणाले की, आता भाजपने आमिष दाखवले, दबाव टाकला किंवा पैसे वाटले असले रडगाणे गाणे हर्षवर्धन सपकाळ यांनी सोडून द्यावे. आपले उमेदवार खरोखरच जिंकणार होते का आणि आपल्याकडे किती मतदार होते, याचे आत्मपरीक्षण त्यांनी आधी करावे. आधीच आमचा सल्ला ऐकला असता, तर काँग्रेसवर आज ही नामुष्की ओढावली नसती, असा टोला त्यांनी लगावला. याचवेळी त्यांनी नवनीत राणा यांनी राज्यसभेची निवडणूक लढायची की नाही, याचा निर्णय त्यांनी स्वतःच घ्यावा, असा सल्लाही दिला.
Vijay waddetiwar : आमच्याच एका नेत्याने पैसे वाटले, वडेट्टीवारांच्या आरोपाने खळबळ
महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीवरून आंदोलन करू पाहणारे आमदार रोहित पवार यांनाही बावनकुळेंनी यावेळी चांगलेच सुनावले. भाजप महायुतीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचे जे आश्वासन दिले होते, ते आम्ही शब्दशः पाळले असून ही एकूण ३६ हजार कोटींची ‘ओरिजनल’ कर्जमाफी आहे, असे बावनकुळे म्हणाले. याउपरही विरोधकांमध्ये कोणाला आंदोलनाचे स्टंट करायचे असतील, तर तो त्यांचा अधिकार आहे, अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी रोहित पवारांची हवा काढून घेतली.








