व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay waddetiwar : आमच्याच एका नेत्याने पैसे वाटले, वडेट्टीवारांच्या आरोपाने खळबळ

Vijay waddetiwar : आमच्याच एका नेत्याने पैसे वाटले, वडेट्टीवारांच्या आरोपाने खळबळ

Wadettiwar’s Claim That “One of Our Own Leaders Distributed Money” Creates a Political Storm : विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये वाद उफळला

Nagpur -नागपूर-वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसने घेतलेल्या नाट्यमय माघारीनंतर आता पक्षांतर्गत यादवी पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वपक्षातीलच एका बड्या नेत्यावर नगरसेवकांना प्रत्येकी ५-५ लाख रुपये देऊन गायब केल्याचा थेट आणि खळबळजनक आरोप केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.वडेट्टीवारांनी थेट नाव घेण्याचे टाळले असले, तरी चंद्रपूरमधील त्यांचे राजकीय वैर कोणासोबत आहे हे सर्वांनाच ठावूक असल्याने, त्यांचा रोख कोणाकडे हे सांगण्याची गरज राहिली नाही.

या निवडणुकीसाठी काँग्रेसने सुरुवातीला शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती, मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी घेतलेल्या माघारीमुळे भाजप महायुतीचे अरुण लखानी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या धक्कादायक माघारीची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अग्रवाल यांना पक्षातून तातडीने निलंबित केले. या निलंबनाला जाहीर आव्हान देत अग्रवाल यांनी, मला निलंबित कशाला करता, थेट बडतर्फच करा असा संताप व्यक्त केला. तसेच, निवडणुकीत नुसती उमेदवारी असून चालत नाही तर नेत्यांचीही मदत लागते, जर काँग्रेसचेच नेते पडद्यामागून विरोधकांना मदत करणार असतील, तर निवडणूक लढायचीच कशाला? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

Cockroach janta party : अभिजीत दीपके भारतात दाखल, दिल्ली विमानतळावर समर्थकांची मोठी गर्दी

अग्रवाल यांच्या या बंडानंतर विजय वडेट्टीवार यांनीही पक्षातील अंतर्गत गद्दारीवर जोरदार तोफ डागली. आमच्याच एका नेत्याने पैसे वाटले असल्याचा आरोप करत वडेट्टीवारांनी, ८० टक्के नगरसेवक भ्रष्ट असल्याचाही खळबळजनक दावा केला. निवडून आल्यानंतर नगरसेवक कुठल्याच पक्षाचे नसतात, जिथून पैसे मिळतील तिथे ते पळतात, अशा शब्दांत त्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, सुरुवातीला या जागेवरून विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र निवडणूक जाहीर होताच अनेक नगरसेवक अचानक गायब झाल्याने त्यांनी निवडणूक लढण्याचा विचार सोडून दिला होता. त्या वेळी भाजपवर नगरसेवक पळवल्याचा आरोप करणाऱ्या वडेट्टीवारांनी आता मात्र स्वपक्षातीलच नेत्यावर पैसे वाटल्याचा आरोप केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

Natural gas : तुटवड्याच्या काळात, अंदमान समुद्रात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला !

या संपूर्ण प्रकरणाला चंद्रपूरमधील जुन्या राजकीय वादाची पार्श्वभूमी आहे. चंद्रपूर महापालिका निवडणूक आणि त्यानंतरच्या महापौरपदाच्या निवडीवरून विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला होता. दोन्ही नेते कुठलीच तडजोड करायला तयार नसल्याने हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला होता. शेवटी खासदाराच्या समर्थकांना महापौरपद तर वडेट्टीवार गटाला स्थायी समिती देण्याचे दिल्लीत ठरले होते, परंतु या तोडग्यानंतरही काँग्रेसला चंद्रपूर महापालिकेत आपली सत्ता स्थापन करता आली नव्हती. आता विधान परिषदेच्या या निवडणुकीत झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे आणि वडेट्टीवारांच्या अंतर्गत पैसे वाटपाच्या आरोपांमुळे काँग्रेसमधील ही दरी आणखी रुंदावली आहे.

error: Content is protected !!