ncp-city-president-missing-establishment-day-program-row-nagpur : स्थापना दिनाच्या कार्यक्रमावरून नागपूरमध्ये पक्षांतर्गत नाराजी
Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांच्या पुढाकाराने बजाजनगर येथील विभागीय कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पक्षाच्या शहर कार्यालयात स्थापना दिनानिमित्त नेमके कोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, शहराध्यक्षांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे “आमचे शहराध्यक्ष नेमके आहेत कुठे?” असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
२७ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही शुभेच्छा संदेशाद्वारे स्थापना दिनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यानिमित्ताने पक्षाशी कार्यकर्ते आणि नागरिकांचा संपर्क वाढावा, या उद्देशाने विविध पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
Reshuffle modi cabinet : राजकीय हालचालींना वेग; मोदी मंत्रिमंडळात फेरबदलांची शक्यता
बजाजनगर येथे प्रशांत पवार यांच्या पुढाकाराने “कार्यकर्त्यांच्या मनातील अजितदादा” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये “अजितदादा पवार यांची कार्यकर्त्यांसोबत जुळलेली नाळ” आणि “अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र” हे विषय देण्यात आले आहेत. याशिवाय अजितदादा पवार यांच्या कार्यावरील छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला, वेषभूषा, नृत्यस्पर्धा तसेच देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमात पारंपरिक झेंडावंदनासह पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच आजी-माजी नगरसेवक आभा पांडे, मनोज सांगोळे, राजू नागुलवार आणि राजेश माटे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या आभा पांडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यासोबतच महापालिका निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांच्या स्वागत व अभिनंदनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांच्या मते, हे सर्व कार्यक्रम पक्षाच्या मुख्य शहर कार्यालयात आयोजित होणे अपेक्षित होते. त्यासाठी शहराध्यक्षांनी पुढाकार घेऊन नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, स्थापना दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात शहर कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती, संदेश किंवा निमंत्रण कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले नसल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी नागपूर शहर काँग्रेसमध्येही अशाच प्रकारे वेगवेगळ्या गटांकडून स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. माजी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या कार्यक्रमाला पर्याय म्हणून दुसऱ्या गटाकडून स्वतंत्र कार्यक्रम घेतले जात होते. नुकत्याच पार पडलेल्या शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्या पदग्रहण सोहळ्यात विकास ठाकरे यांनी आपल्या भाषणातून या गटबाजीचा उल्लेख केला होता.
राजकीय वर्तुळात आता काँग्रेसमधील अशाच प्रकारची गटबाजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दिसून येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. नागपूर महापालिकेत पक्षाचे प्रतिनिधित्व अत्यल्प असून, शहरात पक्षाचा एकही आमदार नाही. तसेच मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. अशा परिस्थितीत पक्ष संघटना मजबूत करण्याची गरज असताना अंतर्गत मतभेद आणि गटबाजीचे चित्र समोर येणे पक्षासाठी चिंतेचा विषय असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.








