24,000 litres of freshwater flowing into the lake every hour; concerns grow over the changing chemistry of Lonar Lake : ताशी २४ हजार लिटर गोडे पाणी सरोवरात; लोणारच्या बदलत्या रसायनशास्त्राची चिंता
Lonar जगातील अत्यंत दुर्मीळ उल्काघात विवरांपैकी एक, रामसर दर्जा प्राप्त आर्द्रभूमी आणि भूवैज्ञानिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणार सरोवराच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सरोवरातील पाणी खरोखर वाढत आहे की त्याच्या जलरचनेत बदल होत आहेत, याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन आणि विकास आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत तीन महिन्यांत कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले तांत्रिक आणि पर्यावरणीय मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरोवरात येणाऱ्या गोड्या पाण्याचे स्रोत आणि त्याचे प्रमाण.
२०१८-१९ मध्ये नागपूर खंडपीठाने गोमुखधार, पापारेश्वर आणि सीतानाहनी परिसरातून सरोवरात येणाऱ्या गोड्या पाण्याचे वैज्ञानिक मोजमाप करण्यासाठी ‘व्ही-नॉच’ प्रणाली बसविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार यंत्रणा उभारण्यात आली; मात्र पुढील काही वर्षांत या मोजमापांची नियमित आणि सुसंगत माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सरोवरातील वाढत्या जलपातळीमागील नेमकी कारणे अद्यापही स्पष्ट झालेली नाहीत.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही वर्षांतील महत्त्वाची आकडेवारी उपलब्ध नसल्याने संशोधनात सातत्य राहिले नाही. त्यामुळे सरोवरातील बदलांचा अचूक अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
दरम्यान, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने मे २०२६ ते सप्टेंबर २०२७ या कालावधीत संपूर्ण हायड्रोलॉजिकल सायकलचा अभ्यास सुरू केला आहे. निरीक्षण विहिरी, मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर जलनोंदी तसेच भूजल प्रवाहाच्या विश्लेषणाद्वारे लोणारच्या वाढत्या पाण्यामागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे.
प्रशासनाने केलेल्या नव्या मोजमापानुसार, गोमुखधार, पापारेश्वर आणि सीतानाहनी या तीन प्रमुख झऱ्यांतून ताशी सुमारे २४ हजार ५४० लिटर गोडे पाणी सरोवरात प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे या झऱ्यांच्या पाण्याचा पीएच सुमारे ७ असून सरोवरातील मुख्य पाण्याचा पीएच १० ते ११ दरम्यान आहे. पूर्वी हा पीएच १३ ते १४ पर्यंत नोंदविला गेला होता.
Prafulla Gudadhe : भाजपनेच २०१९ मध्ये बावनकुळेंचे शटर पाडले; आता ते इतरांना दुकानदारी शिकवत आहेत!
यामुळे गोड्या पाण्याचा वाढता प्रवाह, भूजलस्तरातील बदल आणि सरोवराच्या रासायनिक संरचनेतील संभाव्य बदल यांचा परस्परसंबंध तपासणे अत्यावश्यक बनले आहे. कारण हा केवळ पाण्याचा प्रश्न नसून लोणारच्या पर्यावरणीय संतुलनाचा, जैवविविधतेचा आणि शेकडो वर्षांच्या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाचा विषय आहे. सरोवर वाढत आहे की बदलत आहे, याचे उत्तरच भविष्यातील विकास आणि संवर्धन आराखड्याची दिशा ठरवणार आहे.








