व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay raut : ‘आई, तुळजाभवानी, साईबाबा आणि मुलांची शपथ घेऊन खासदारांनी निष्ठा...

Sanjay raut : ‘आई, तुळजाभवानी, साईबाबा आणि मुलांची शपथ घेऊन खासदारांनी निष्ठा व्यक्त केली’

sanjay-raut-claims-shiv-sena-mps-assured-uddhav-thackeray-amid-operation-tiger-speculation : ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर संजय राऊतांचा पलटवार

Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली असताना पक्षाचे खासदार आणि प्रमुख नेते संजय राऊत यांनी या सर्व चर्चांवर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. तथाकथित ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटातील खासदारांना फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या दाव्यांवर भाष्य करताना राऊत यांनी पक्षाचे सर्व नऊ खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचा दावा केला.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन टायगर’ या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ऑपरेशन ही वैद्यकीय क्षेत्रातील प्रक्रिया असून राजकारणात त्याचा वापर करून लोकप्रतिनिधींची फोडाफोडी केली जात असल्याची टीका त्यांनी केली. लोकप्रतिनिधींची खरेदी-विक्री आणि पक्षांतर घडवून आणण्याच्या प्रयत्नांना ‘ऑपरेशन’ असे नाव देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मातोश्रीवर झालेल्या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले नसल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले होते. मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना राऊत यांनी सर्व खासदार बैठकीत सहभागी झाले होते आणि पक्षाशी त्यांची बांधिलकी कायम असल्याचे सांगितले.

Ncp meeting : महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी वैशाली नागवडे आघाडीवर, संघटनात्मक फेरबदलांना वेग

यावेळी त्यांनी एक मोठा दावा करत सांगितले की, बैठकीत सहभागी झालेल्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. काहींनी आईची शपथ घेतली, काहींनी तुळजाभवानीची शपथ घेतली, तर काहींनी साईबाबा आणि स्वतःच्या मुलांची शपथ घेऊन पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा शब्द दिला. त्यामुळे खासदार फुटीच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना भेटत नाहीत, पक्षातील संवाद कमी झाला आहे किंवा निधीच्या प्रश्नांमुळे नाराजी वाढली आहे, अशा चर्चांचाही राऊत यांनी फेटाळून लावल्या. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांशी सर्वाधिक संवाद साधणाऱ्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, असे ते म्हणाले. मातोश्रीचे दरवाजे पक्षातील सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांसाठी नेहमी खुले असल्याचे त्यांनी नमूद केले.

खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने निर्माण झालेल्या चर्चांवरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. एखादा खासदार किंवा लोकप्रतिनिधी केंद्रीय मंत्र्यांना भेटला म्हणून त्यातून पक्षांतराचा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. लोकप्रतिनिधींना विविध कामांसाठी केंद्रीय नेत्यांना भेटावे लागते, असे सांगत त्यांनी या भेटीचे राजकीय अर्थ लावण्यास विरोध केला.

यावेळी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापराबाबतही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सध्या काही पक्षांमध्ये निर्माण झालेला प्रभाव हा वैचारिक नसून तपास यंत्रणांच्या धाकामुळे असल्याचा आरोप त्यांनी केला. भविष्यात राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर हा प्रभाव कायम राहणार नाही, असेही ते म्हणाले.

Operation tiger : ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलं !

उद्धव ठाकरे यांनी बैठकीत ‘ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे’ असे वक्तव्य केल्याच्या चर्चांवरही राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. अशा प्रकारचे कोणतेही विधान उद्धव ठाकरे यांनी केले नसल्याचा दावा त्यांनी केला. बैठकीला आपण स्वतः उपस्थित होतो आणि असे कोणतेही वक्तव्य त्यांच्या तोंडून निघाले नाही, असे राऊत यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, शिंदे गटाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर काही मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात, अशा चर्चांवर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी विरोधकांवर टीका केली. पक्ष फोडण्याच्या राजकारणापलीकडे काहीही नवीन घडणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातील एकजूट आणि निष्ठा पुन्हा एकदा दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असले तरी ठाकरे गटातील सर्व खासदार पक्षासोबतच राहतील आणि आगामी काळातही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कायम ठेवतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींवर राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

__

error: Content is protected !!