Cash shortage during the Kharif season; District Collector appeals to the Reserve Bank for intervention : एटीएममध्ये ‘नो कॅश’, शेतकरी हैराण; बुलढाण्यात चलन पुरवठ्यावरून चिंता वाढली
Buldhana खरीप हंगामाची धामधूम सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यात रोख चलनाच्या अपुऱ्या पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये आवश्यकतेच्या तुलनेत केवळ ६० ते ७० टक्केच रोकड उपलब्ध होत असल्याने बँका, एटीएम आणि ग्राहकांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी एटीएममध्ये वारंवार ‘नो कॅश’ची स्थिती निर्माण होत असून नागरिकांसह शेतकऱ्यांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
खरीप हंगामामुळे जिल्ह्यात आर्थिक व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. पीक कर्ज वितरणाला वेग आला असून शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर कृषी साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रोकड काढत आहेत. ग्रामीण भागात अद्यापही अनेक व्यवहार रोखीने होत असल्याने चलनाची मागणी वाढली आहे. मात्र पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध होत नसल्याने बँक शाखा आणि एटीएमवरील ताण वाढल्याचे दिसून येत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाला पत्र पाठवून जिल्ह्यासाठी आवश्यक प्रमाणात रोख चलन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील बँकिंग व्यवस्थेवर वाढणारा दबाव आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेता तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राची दखल घेत रिझर्व्ह बँकेने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे आगामी काळात चलन पुरवठा वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Eknath Shinde Shivsena : ‘शिवसेना पक्ष नव्हे, चळवळ’; अकोला जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्याचा निर्धार
विशेष म्हणजे, खरीप हंगाम हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. अशा काळात रोकड टंचाई निर्माण झाल्यास त्याचा परिणाम केवळ बँकिंग व्यवहारांपुरता मर्यादित राहत नाही, तर शेतीच्या नियोजनावर आणि बाजारपेठेतील व्यवहारांवरही होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील वाढती रोकड मागणी लक्षात घेऊन चलन पुरवठा सुरळीत करणे ही यंत्रणांसमोरील तातडीची गरज बनली आहे. आता रिझर्व्ह बँकेकडून पुरवठा वाढतो का आणि एटीएममधील ‘नो कॅश’ची समस्या कितपत कमी होते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.








