Nitin gadkari slams autority of nagpur airport : केंद्रीय मंत्र्यांसमोरच नितीन गडकरी कडाडले, नागपूर विमानतळचे GMR कंपनीकडे हस्तातरण
Nagpur नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास आणि दुसऱ्या धावपट्टीसाठी आम्ही तब्बल १८ वर्षांपासून भांडत आलो आहोत. आता कुठे कोर्ट कचेऱ्यांचे आणि मंजुरीचे सर्व अडथळे दूर होऊन अंतिम यश मिळाले आहे. त्यामुळे आता या कामात एक दिवसाचाही उशीर खपवून घेतला जाणार नाही. दिल्लीत अडकणाऱ्या नागपूरच्या फाईल्स आठ दिवसांत मंजूर करा, त्यासाठी तुमच्या अधिकाऱ्यांना थेट दंडुके लावा अशा आक्रमक शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना विनंती केली.
या लेटलतीफीवर मी आता यापेक्षा जास्त काही बोलत नाही, नाहीतर वेगळा विषय होईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकृतपणे ‘जीएमआर’ (GMR) समूहाकडे सोपवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी खासदार मायाताई इवनाते आणि नागपूरच्या महापौर निता ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या वेळी गडकरींनी विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) ढिसाळ कारभारावर आणि धावपट्टीच्या कामाला झालेल्या विलंबावर जाहीर कार्यक्रमात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. धावपट्टीच्या कामाला विनाकारण दीड वर्ष उशीर लावल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आणि मी स्वतः या नोकरशाहीच्या दिरंगाईमुळे प्रचंड त्रासलो होतो,अशी कबुली त्यांनी दिली. विमानतळाचा विकास करणाऱ्या ‘जीएमआर’ (GMR) कंपनीला सूचना देताना ते म्हणाले की, वर्धा रोड बाजूने कनेक्टिव्हिटी देण्यासाठी सरकारने नियमाबाहेर जाऊन ४०० कोटी रुपये दिले आहेत; आता जीएमआरने दुसऱ्या बाजूनेही तेवढीच उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून द्यावी. तसेच, नागपूरची जगप्रसिद्ध संत्री व संत्राबर्फी, आंतरराष्ट्रीय ब्रँड झालेले ‘सावजी मटण’ आणि स्थानिक हँडलूम कापडाचा प्रचार होण्यासाठी नवीन विमानतळावर विशेष स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी आग्रही मागणीही नितीन गडकरी यांनी केली.
नागपूर आणि संपूर्ण विदर्भासाठी आजचा क्षण ऐतिहासिक असल्याचे सांगत गडकरींनी या प्रकल्पाचा वेगाने पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ ते ९ वेळा दिल्ली वाऱ्या केल्याचा उल्लेख केला, तसेच केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही मानले.
नागपूरच्या भौगोलिक आणि आर्थिक ताकदीवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, नागपूर हे देशाचे ‘लॉजिस्टिक्स कॅपिटल हब’ म्हणून विकसित होत आहे, जिथून देशातील चारही प्रमुख मेट्रो शहरे अवघ्या सव्वा तासाच्या अंतरावर आहेत. विदर्भाच्या जंगलात आजमितीस ३५० हून अधिक वाघ असून ते पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत आहेत. या पर्यटन वाढीसाठी आणि विदर्भातील अथांग खनिज संपत्तीच्या दळणवळणासाठी हे विमानतळ मैलाचा दगड ठरेल. आज विदर्भात तब्बल साडेसात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत असून नागपूर हे ‘स्कील हब’ म्हणून नावारूपास येत आहे. येथे मजबूत रस्ते, रेल्वे, मेट्रोचे जाळे असून भविष्यात बुलेट ट्रेनही येणार आहे. तसेच ४९ इंजिनिअरिंग कॉलेजेस, एअर इंडियाचा ‘एमआरओ’ (MRO) आणि एक खासगी एमआरओ कार्यरत असल्याने देश-विदेशातील विमाने येथे देखभालीसाठी येतात. तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या शेजारील राज्यांनाही नागपूर विमानतळ अत्यंत सोयीचे असून सध्या नागपूरच्या आकाशातून दररोज ३५० कार्गो व पॅसेंजर विमाने उड्डाण करतात, अशी महत्त्वाची आकडेवारी त्यांनी मांडली.
Mva Meeting : मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी; उद्धव ठाकरे संतप्त
१९९६ साली मिहान (MIHAN) प्रकल्पाची पायाभरणी करून पॅसेंजर आणि कार्गो हबची जी दूरगामी योजना आखण्यात आली होती, त्याची फळे आता दिसत असून आज एअरबस आणि बोईंग विमानांचे अनेक सुटे भाग नागपूरमध्ये तयार होत आहेत.
प्रफुल्ल पटेल उड्डाण मंत्री असताना त्यांनी हे विमानतळ मिहानकडे सोपवले आणि आज ते जीएमआरकडे हस्तांतरित होत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी केंद्रीय उड्डाण मंत्र्यांकडे नागपूर ते सिंगापूर आणि दुबई अशी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची, तसेच युरोप आणि अमेरिकेसाठी थेट कनेक्टिव्हिटी देण्याची आग्रही मागणी केली. अमरावती विमानतळही सज्ज झाले असून रिजनल एअरलाईन्समुळे विदर्भातील पर्यटन आणि खनिज उद्योगाला मोठी ताकद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला








