mva-meeting-23-mlas-absent-uddhav-thackeray-questions-opposition-unity : ‘आपण खरोखर एकत्र आहोत का?’ असा थेट सवाल
Mumbai : पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला तब्बल 23 आमदार गैरहजर राहिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अलीकडच्या काळात विरोधी पक्षातील काही नेत्यांच्या सत्ताधारी गटात जाण्याच्या चर्चांमुळे आधीच राजकीय वातावरण तापले असताना या बैठकीतील मोठ्या प्रमाणातील गैरहजेरीने महाविकास आघाडीच्या एकजुटीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या तिन्ही घटक पक्षांचे अनेक आमदार अनुपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचीही गैरहजेरी लक्षवेधी ठरली.
बैठकीला गैरहजर राहिलेल्या आमदारांमध्ये जयंत पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, रोहित पवार, अस्लम शेख, संदीप क्षीरसागर, सुनील राऊत, गजानन लवटे, बाबाजी काळे, राहुल पाटील, संजय दरेकर, विश्वजित कदम, अभिजीत पाटील आणि विकास ठाकरे यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आणखी काही आमदारही बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
या गैरहजेरीबाबत स्पष्टीकरण देताना जयंत पाटील यांनी बैठकीची तारीख बदलल्यामुळे गैरसमज झाल्याचे सांगितले. सुरुवातीला बैठक 23 जून रोजी आयोजित करण्यात आली होती, मात्र नंतर ती 24 जूनला घेण्यात आली. दरम्यान त्यांनी पूर्वनियोजित वैयक्तिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे बैठकीस उपस्थित राहणे शक्य झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Sanjay Sawkare : बुलढाण्यात पालकमंत्री सक्रिय, सहपालकमंत्री ‘मिसिंग’?
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे आमदार सुनील राऊत आणि काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनीही मतदारसंघातील महत्त्वाच्या कामांमुळे बैठकीला उपस्थित राहता आले नसल्याचे सांगितले. बैठकीला गैरहजर राहिलो म्हणजे पक्ष किंवा आघाडी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
मात्र या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीवरच प्रश्न उपस्थित केला. “आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र असल्याचे सांगतो, पण प्रत्यक्षात आपण खरोखर एकत्र आहोत का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
विधिमंडळ अधिवेशनात विरोधक म्हणून एकसंध भूमिका घेणे आवश्यक असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील सभा, बैठका, आंदोलने आणि जनसंपर्क कार्यक्रमही संयुक्तपणे आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधकांची एकी दिसली पाहिजे, तरच सत्ताधाऱ्यांविरोधात प्रभावी लढा उभारता येईल, असे मत त्यांनी मांडले.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. अशा वेळी 23 आमदारांची गैरहजेरी आणि त्यावरून व्यक्त झालेली नाराजी यामुळे विरोधी आघाडीतील अंतर्गत समन्वयाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आगामी काळात या घडामोडींचा महाविकास आघाडीच्या राजकीय रणनीतीवर आणि एकजुटीवर काय परिणाम होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.








