व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Tet paper leak : ‘गुरुजींचाही पेपर फुटला!’ ‘नीट’नंतर आता महाटीईटी प्रश्नपत्रिका लीक

Tet paper leak : ‘गुरुजींचाही पेपर फुटला!’ ‘नीट’नंतर आता महाटीईटी प्रश्नपत्रिका लीक

maha-tet-paper-leak-exam-postponed-thane-sit-investigation : परीक्षा स्थगित, सहा लाखांहून अधिक उमेदवारांचे भविष्य टांगणीला

Mumbai: देशभरात स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) प्रश्नपत्रिका फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षा ऐनवेळी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या घटनेमुळे राज्यातील तब्बल ६ लाखांहून अधिक उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण अद्याप चर्चेत असतानाच आता शिक्षक पात्रता परीक्षेलाही गळतीचे ग्रहण लागल्याने परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई करत प्रश्नपत्रिका विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक केली. मुंबई-नाशिक महामार्गावरील ओवळी डोंगराळी गावाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून महाटीईटीच्या प्रश्नपत्रिकेचे चार संच जप्त केले. शिक्षण विभागाने पडताळणी केल्यानंतर या प्रश्नपत्रिका रविवारी होणाऱ्या परीक्षेच्याच असल्याचे स्पष्ट झाले.

Nagpur municipal corporation: नगरसेवकांना २५ लाख फंड, नागपूर शहराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास

अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका विक्रीसाठी काही जण भिवंडीत येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. या आरोपींना प्रश्नपत्रिका नेमक्या कुठून मिळाल्या, त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे आणि शिक्षण विभागातील कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात या प्रश्नपत्रिकांची छपाई आग्रा येथील एका छापखान्यात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका छपाई प्रक्रियेदरम्यानच गळती झाल्याची शक्यता तपासली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध राज्यांमध्ये तपासाची व्याप्ती वाढविली आहे.

Uddhav Thackeray: हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढा, उद्धव ठाकरेंचे आव्हान

या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, ठाण्याचे सह-पोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री यांनी पोलिस महासंचालक सदानंद दाते तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून या प्रकरणाची पाळेमुळे शोधून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे धीरज बलराज सिंग (हरयाणा), राजीव शाव (बिहार) आणि आकाशकुमार सरोजकुमार (बिहार) अशी आहेत. धीरज हा विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून, इतर दोघेही सुशिक्षित आणि सधन कुटुंबातील असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

प्रश्नपत्रिका फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शासनाने पुढील आदेश येईपर्यंत महाटीईटी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील ६ लाख १२५ परीक्षार्थींना मोठा मानसिक आणि आर्थिक फटका बसला आहे. अनेक उमेदवार परीक्षा केंद्रांवर जाण्याच्या तयारीत असतानाच हा निर्णय जाहीर झाल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Mpsc new pattern : एमपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! आता वर्षातून तीन वेळा संधी

गेल्या काही वर्षांत देशभरात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना सातत्याने घडत आहेत. विशेषतः ‘नीट’ परीक्षेच्या गोंधळानंतर परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. त्या प्रकरणात अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला होता. काही विद्यार्थ्यांनी टोकाची पावले उचलल्याच्या घटनांमुळे परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर मोठी चर्चा झाली होती. अशा पार्श्वभूमीवर महाटीईटीची प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा प्रणालीवरील जनतेचा विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे.

या घटनेवरून विरोधकांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. पेपरफुटी ही संघटित रॅकेटची देण असल्याचा आरोप करत परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, सुरक्षितता आणि तंत्रज्ञानाधारित नियंत्रण व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी केली जात आहे. तसेच वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

महाटीईटी पेपरफुटीचे धागेदोरे आता अनेक राज्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, एसआयटीच्या तपासातून या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होणार का, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

___

error: Content is protected !!