mpsc-new-exam-pattern-three-attempts-optional-subject-removed-2027 : मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषयही रद्द, जाणून घ्या नवी परीक्षा पद्धत
Mumbai: राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. परीक्षा पद्धतीत मोठे बदल करत आयोगाने उमेदवारांना एका वर्षात अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या धोरणानुसार एमपीएससीच्या पूर्व परीक्षा आता वर्षातून तीन वेळा घेतल्या जाणार असून, राज्य सेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय पूर्णपणे वगळण्यात येणार आहेत. आयोगाने केलेले हे बदल २०२७ पासून लागू होणार असून स्पर्धा परीक्षांच्या तयारीत हा मोठा टप्पा मानला जात आहे.
सध्याच्या पद्धतीत उमेदवारांना वर्षातून केवळ एकदाच पूर्व परीक्षा देण्याची संधी मिळते. त्यामुळे एका दिवसाची चूक किंवा अनपेक्षित अडचण संपूर्ण वर्षावर पाणी फेरत होती. नव्या पद्धतीमुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून तीन वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एका वर्षात अनेक संधी उपलब्ध होणार असून मानसिक ताणही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
एमपीएससीने केलेला दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे राज्य सेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. यामुळे उमेदवारांना वैकल्पिक विषयांचे दोन स्वतंत्र पेपर द्यावे लागणार नाहीत. अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून या बदलाची मागणी होत होती. या निर्णयामुळे अभ्यासाचा भार कमी होण्यासोबतच सर्व उमेदवारांसाठी समान संधी निर्माण होणार असल्याचे मानले जात आहे.
Tukaram mundhe : महिन्याभरातच भेसळखोरांवर मुंढेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
दरम्यान, आयोगाने ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ ची अधिसूचना देखील प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण २६१९ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये लिपिक-टंकलेखकांची १८६४ पदे, सहायक मोटार वाहन निरीक्षकांची ४६१ पदे, कर सहाय्यकांची २८२ पदे, उद्योग निरीक्षकांची ९ पदे आणि तांत्रिक सहाय्यकांची ३ पदे समाविष्ट आहेत. या भरतीसाठी २७ जून ते १७ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार असून, २७ सप्टेंबर २०२६ रोजी संगणक आधारित ऑनलाइन पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.
मात्र, ऑनलाइन परीक्षा पद्धतीवरून नव्या वादालाही सुरुवात झाली आहे. एमपीएससीने भरती प्रक्रिया स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या निर्णयाचे स्वागत झाले असले, तरी खासगी एजन्सीमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत विद्यार्थी आणि एमपीएससी समन्वय समितीने गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. यापूर्वी विविध भरती परीक्षांमध्ये पेपरफुटी, तोतया उमेदवार, तांत्रिक गैरप्रकार आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या मते, ऑनलाइन परीक्षा अनेक सत्रांमध्ये घेतल्या जात असल्यामुळे गुणांचे समानीकरण करण्यासाठी ‘नॉर्मलायझेशन’ पद्धतीचा वापर केला जातो. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच ग्रामीण भागातील उमेदवारांना परीक्षा केंद्रांसाठी दूरच्या शहरांमध्ये जावे लागते, त्यामुळे त्यांचा आर्थिक भार वाढतो. परीक्षा सुरू असताना सर्व्हर डाऊन होणे, संगणक बंद पडणे किंवा तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यताही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
Uday Samant : ‘ना पोलिस बंदोबस्त, ना पायलट गाडी; माझ्याच बाबतीत असं का होतंय?’
यापूर्वी गट-कच्या मोठ्या परीक्षा ऑफलाइन ओएमआर पद्धतीने यशस्वीपणे पार पडल्या असताना आता ऑनलाइन परीक्षा घेण्यामागील कारणांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या नव्या परीक्षा पद्धतीचे एका बाजूला स्वागत होत असताना, ऑनलाइन प्रणालीबाबत आयोगाने अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करण्याची गरज असल्याची भावना स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
एकूणच, वर्षातून तीन परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय हटवण्याचा निर्णय हा एमपीएससीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक मानला जात आहे. मात्र या बदलांसोबत ऑनलाइन परीक्षा पद्धतीवरील प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देणे हेही आयोगासमोरचे मोठे आव्हान असणार आहे.








