18,000-record discrepancy between Kirit Somaiya’s figures and the Municipal Corporation’s data : सोमय्या आणि पालिकेच्या आकडेवारील १८ हजार नोंदींची तफावत, चौकशीची मागणी
Amravati अमरावती महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील ‘सिटिझन रजिस्ट्रेशन सिस्टम’ आणि ‘सुधार’ पोर्टलवरील नोंदींवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ८ जून रोजी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी खासदार बळवंत वानखडे यांना दिलेल्या अधिकृत पत्रातील आकडेवारी सोमय्या यांनी मांडलेल्या आकड्यांपेक्षा वेगळी असल्याने या प्रकरणात संभ्रम निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. सोमय्या यांनी केलेले दावे आणि महापालिकेने खासदारांना दिलेल्या अधिकृत माहितीत मोठी तफावत असल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पोर्टलवर आकडे दिसतात; मात्र यादी डाऊनलोड होत नसल्याने संशय निर्माण होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोर्टलवर ३५,१४० आणि ५,६९३ अशा नोंदी दिसत असल्या तरी त्यांची सविस्तर यादी डाऊनलोड होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
Diesel in cans : शेतीसाठी कॅनमधून ४० लिटर डिझेलला मिळणार परवानगी?
पोर्टलवर आकडे उपलब्ध असतानाही मूळ माहिती मिळत नसल्यामुळे हा तांत्रिक बिघाड आहे की अन्य काही गैरव्यवहार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याशिवाय किरीट सोमय्या यांनी मांडलेल्या सुमारे ५३ हजार नोंदी आणि अधिकृत पत्रातील ३५ हजार नोंदी यामध्ये सुमारे १८ हजारांचा फरक असल्याने या प्रकरणातील संभ्रम अधिकच वाढला आहे.
‘भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रातील आकडेवारी आणि प्रशासनाने मला दिलेल्या अधिकृत पत्रातील आकडेवारीत तब्बल १८ हजारांची तफावत आहे. तसेच पोर्टलवर आकडे दिसत असले तरी यादी डाऊनलोड होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणात नेमके सत्य काय, हे अमरावती महानगरपालिका प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून स्पष्ट करावे,’ अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली.








