diesel-in-cans-for-farmers-40-litre-demand-peso-rules-farming-update : पावसात मशागतीला वेग, पण इंधन नियमांमुळे बळीराजा अडचणीत; सरकारसमोर मोठे आव्हान
Mumbai: राज्यात समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील शेतीच्या मशागतीला वेग आला असला, तरी डिझेल विक्रीवरील नव्या निर्बंधांमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. ट्रॅक्टर, पंप आणि इतर कृषी यंत्रांसाठी कॅन किंवा बॅरलमधून डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतीच्या गरजेसाठी किमान ४० लिटर डिझेल कॅनमधून देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
केंद्र सरकारने या महिन्याच्या मध्यात पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना (पेसो) मान्यताप्राप्त कंटेनरमध्येच वाहनांशिवाय पेट्रोल आणि डिझेल देण्याचे आदेश जारी केले. तसेच एका व्यक्तीला एका दिवसात एका वाहनासाठी कमाल २०० लिटर इंधन विक्रीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव आणि इंधनाचा संभाव्य गैरवापर, साठेबाजी तसेच काळाबाजार रोखण्याच्या उद्देशाने हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
America iran war : ‘इराणचे अस्तित्व मिटवून टाकू’; ट्रम्प यांचा थेट इशारा, होर्मुझजवळ भीषण हवाई हल्ले
मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ग्रामीण भागात ट्रॅक्टर, डिझेल पंप आणि इतर कृषी यंत्रे थेट पेट्रोल पंपावर नेणे शक्य नसते. त्यामुळे शेतकरी नेहमीप्रमाणे प्लास्टिक कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल घेऊन जात असत. नव्या नियमांनुसार अशा कंटेनरमध्ये डिझेल देण्यास बंदी आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.
यामध्ये आणखी एक गंभीर अडचण म्हणजे बाजारात पेसो मान्यताप्राप्त कंटेनर सहज उपलब्ध नाहीत. त्यामुळे नियमांचे पालन करायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. परिणामी अनेक ठिकाणी ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांसाठी आवश्यक डिझेल मिळत नसल्याने मशागतीच्या कामांवर परिणाम होऊ लागला आहे.
दरम्यान, आखाती भागातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवरही परिणाम झाल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत इंधनाचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्बंध लागू केले असले, तरी शेतीसारख्या अत्यावश्यक क्षेत्रासाठी स्वतंत्र सवलत देण्याची मागणी जोर धरत आहे.
Tet paper leak : ‘गुरुजींचाही पेपर फुटला!’ ‘नीट’नंतर आता महाटीईटी प्रश्नपत्रिका लीक
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील घोटावडे गावासह विविध भागांतील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन देत शेतीसाठी किमान ४० लिटर डिझेल कॅनमधून देण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून सुधारित आदेश जारी करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शेतात काम सुरू असताना ट्रॅक्टरमध्ये डिझेल संपल्यास वाहन पाच ते दहा किलोमीटर दूर असलेल्या पेट्रोल पंपापर्यंत नेणे शक्य नसते. अनेकदा ट्रॅक्टर ओढत न्यावा लागतो किंवा काम अर्धवट सोडावे लागते. यामुळे वेळ, पैसा आणि शेतीचे मोठे नुकसान होत असून पेरणी व मशागतीच्या कामांवर थेट परिणाम होत आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या या समस्येवर सरकारने तातडीने तोडगा काढावा, शेतीसाठी विशेष सवलत जाहीर करून कॅनमधून किमान ४० लिटर डिझेल देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता राज्यभरातील शेतकरी संघटना आणि शेतकरी सातत्याने करत आहेत. सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
___








