₹18 crore allocated for farmers affected by unseasonal rainfall : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांसाठी १८ कोटींचा निधी, सत्ताधारी विरुद्ध तुपकर समर्थक आमनेसामने
Buldhana अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सुमारे १२ हजार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अखेर १८ कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असतानाच या निधीच्या मंजुरीवरून राजकीय श्रेयवादाला सुरुवात झाली असून, सत्ताधारी आणि शेतकरी संघटनांकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत.
सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून हा निधी पालकमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केला जात आहे. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत मिळवून दिल्याचे सत्ताधारी गटाचे म्हणणे आहे.
TET paper leak : टीईटी पेपरफुटीवरून राजकारण तापले; सपकाळ-कुलकर्णी आमनेसामने
दुसरीकडे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी या मदतीचे श्रेय आपल्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला दिले आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघटनेने उभारलेल्या तीव्र आंदोलनामुळेच शासनावर दबाव निर्माण झाला आणि अखेर मदत जाहीर करण्यास सरकारला भाग पाडले गेले, असा दावा त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात श्रेयवादाची चर्चा रंगली आहे. शासनाचा प्रशासकीय निर्णय आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे निधी मंजूर झाला की शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला, यावरून दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका ठामपणे मांडली जात आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे हे महत्त्वाचे असले तरी त्या निर्णयाचे राजकीय भांडवल करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणुकांमध्ये प्रभाव पडू शकतो, अशी चर्चा आहे.








