maharashtra-heavy-rain-mumbai-local-mumbai-pune-route-closed-landslide-flood-updates : मुंबई–पुणे मार्ग बंद, दरडी-पुरामुळे जनजीवन कोलमडले
Mumbai: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोकणातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीमुळे रेल्वे, रस्ते वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. मुंबई लोकल सेवा उशिराने धावत असून, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, जुना महामार्ग आणि रेल्वे मार्गही दरडी कोसळल्यामुळे बंद करण्यात आले आहेत.
मुंबईत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. नालासोपारा परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने उपनगरी रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे, पश्चिम रेल्वेच्या गाड्या २० ते २५ मिनिटे तर हार्बर मार्गावरील लोकल सुमारे १० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या लाखो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
Teachers Protest : ९ जुलैला राज्यभर ‘शाळा बंद’ आंदोलनाची हाक
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. स्लॅब कोसळून डोंगरावरील माती आणि पाण्याचा मोठा लोंढा मार्गावर आल्याने प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद केली. याशिवाय अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने द्रुतगती मार्गावरील परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरही अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, लोणावळा घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या अनेक तासांपासून वाहतूक संथ गतीने सुरू असून, काही ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने अत्यावश्यक कारणाशिवाय या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
रेल्वे वाहतुकीलाही मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुणे – मुंबई रेल्वे मार्गावरील ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता आहे.
Modi Cabinet : मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा; महाराष्ट्राला तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता
रायगड जिल्ह्यात सावित्री, कुंडलिका, अंबा आणि पाताळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड, रोहा, नागोठणे, पेण, खोपोली आणि परिसरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. काही ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाली असली तरी अनेक गावांमध्ये पूरस्थिती कायम आहे. चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
राज्यातील अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, जुना मुंबई–पुणे महामार्ग, मुंबई–गोवा महामार्गावरील चिपळूणजवळील खवटी परिसर, रायगडमधील पेण–खोपोली मार्ग, सुकेळी खिंड, माणगाव–पाली मार्ग तसेच माणगाव–पुणे ताम्हणी घाट मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, विशेषतः मुंबई–पुणे प्रवास पुढील आदेशापर्यंत करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही तास राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि अधिकृत माहितीनुसारच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
___








