Prafull Gudhe launches a letter campaign against BJP leaders holding posts in the name of OBCs; first letter sent to Chandrashekhar Bawankule : ओबीसी नेत्यांचा वापर फक्त निवडणुकांसाठी’; प्रफुल गुडधे यांची टीका
Nagpur : भाजपचे नेते स्वतःला ओबीसींचे कैवारी म्हणवून घेतात, मात्र ओबीसींच्या हक्काची जातनिहाय जनगणना करण्याची वेळ येते तेव्हा मौन बाळगतात. ओबीसींच्या नावावर पदे मिळवायची, मिरवायची आणि समाजाच्या मुख्य मुद्द्यावर पळ काढायची ही भाजप नेत्यांची दुटप्पी भूमिका आता सहन केली जाणार नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी गुडधेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या ८२ ओबीसी नेते, मंत्री, आमदार आणि नगरसेवकांना पत्र पाठवून ओबीसी जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले. या मोहिमेतील पहिले पत्र आजच जीपीओ मधून बावनकुळे यांना पोस्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेत पुढे बोलताना प्रफुल गुडधे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या दाव्यांवर निशाणा साधला.
Flood updates : मुसळधार पावसाने महाराष्ट्र ठप्प! मुंबई विस्कळीत
भाजपचे नेते नेहमी आमचा पक्ष ओबीसींचा असल्याचा दावा करतात आणि देवेंद्र फडणवीस तर ‘माझा डीएनए ओबीसीचा आहे’ असे ठासून सांगतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जर हे दावे खरे असतील, तर मग जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना का केली जात नाही? ओबीसी घरांची संख्या किती, त्यांची आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय ताकद किती, हे देशासमोर का येऊ दिले जात नाही? असे सवाल उपस्थित करत, दुसऱ्या टप्प्यातील जनगणना खरोखरच जातीनिहाय होणार की नाही, याबाबत जनतेच्या मनात मोठी शंका असल्याचे गुडधे म्हणाले.
भाजपमधील अंतर्गत राजकारणावर टोला लगावताना गुडधे म्हणाले की, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या भाजपमध्ये नंबर दोनचे नेते असून ओबीसींचे प्रमुख चेहरे आहेत. बावनकुळे साहेब मुख्यमंत्री होणार असा दावा केला जातो, आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत. पण, ओबीसी नेता सर्वोच्च पदावर जाणार असेल तर त्यांनी केवळ पदे भूषवून चालणार नाही, तर ओबीसींच्या कल्याणासाठी ठोस भूमिका घ्यावी लागेल. केवळ पदाला चिकटून न बसता त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी. हे पत्र भाजपच्या ८२ प्रमुख बहुजन लोकप्रतिनिधी आणि मनपातील माजी नगरसेवकांना पाठवले जात असून, त्यांच्याकडून १५ दिवसांत उत्तराची अपेक्षा आहे. उत्तर न आल्यास रिमाइंडर पाठवले जाईल आणि तरीही भूमिका स्पष्ट न केल्यास ओबीसींच्या नावाने मते मागून नेते म्हणून मिरवणाऱ्या या सर्व नेत्यांना जनतेसमोर पूर्णपणे ‘एक्स्पोज’ केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
Teachers Protest : ९ जुलैला राज्यभर ‘शाळा बंद’ आंदोलनाची हाक
केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना गुडधे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला होकार दर्शवला होता, मात्र त्यानंतर ओबीसी समाजाची स्पष्ट फसवणूक करण्यात आली. भाजप हा नेहमीच ओबीसी समाजाच्या विरोधात राहिला असून, येथील ओबीसी नेत्यांचा वापर केवळ राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी केला जातो, असा गंभीर आरोपही प्रफुल गुडधे यांनी शेवटी केला.








