ambadas-danve-slams-bjp-over-ramraksha-andolan-navneet-rana-statement : अंबादास दानवेंचा भाजपवर हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनावरूनही सुनावले
Gondia : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. 18 जुलै रोजी नागपुरात होणाऱ्या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी नवनीत राणा आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्या वक्तव्यांना “चिल्लर विषय” म्हणत फेटाळले. त्याचबरोबर राज्यातील राजकारण, सरकारी बंगल्यांचा वाद आणि लाडकी बहीण योजनेवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या प्रश्नावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “नवनीत राणा आणि नवनाथ बन हे चिल्लर विषय आहेत. अशा विषयांवर मी बोलत नाही,” असे सांगत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका केली.
राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षावरही दानवे यांनी भाष्य केले. “राज्यात सर्वत्र ‘त्यांचीच अडवा आणि त्यांचीच जिरवा’ अशी परिस्थिती आहे. भाजप राष्ट्रवादीची जिरवते आणि राष्ट्रवादी भाजपची जिरवते,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
Rape attempt : छाती दाबणे बलात्कार नाही, उच्च न्यायालयाचे निरीक्षण; महिला आयोगाची तीव्र प्रतिक्रिया
सरकारी बंगल्यांच्या वादावर बोलताना दानवे यांनी उपसभापती सचिन अहिर यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला बंगला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला. जर भाजप आपल्या प्रदेशाध्यक्षाला सरकारी बंगला देत असेल, तर इतर सर्व पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही समान सुविधा मिळायला हव्यात. सरकारी मालमत्ता ही जनतेची असून तिचा वापर नियमांनुसारच झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे विकासाचा अजेंडा नसल्याची केलेली टीकाही दानवे यांनी फेटाळली. “भारतीय जनता पक्षाकडे विकासाचा नव्हे, तर देशाला लुटण्याचा अजेंडा आहे,” असा पलटवार त्यांनी केला.
Sudhir Mungantiwar : नीरा नदीच्या तिरावर मुनगंटीवारांनी अनुभवली वारकरी परंपरेची दिव्यता!
लाडकी बहीण योजनेतील मोठ्या संख्येने अर्ज अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावर दानवे यांनी सरकारवर टीका केली. लाखो महिलांचे अर्ज बाद झाल्याचा उल्लेख करत त्यांनी ही योजना निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राबविण्यात आली होती, असा आरोप केला. पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि योजनांची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, रामरक्षा आंदोलन, हनुमान चालीसा पठण आणि महायुतीतील अंतर्गत वाद या मुद्द्यांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
__








