व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Maharashtra bandh : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’

Maharashtra bandh : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’

maharashtra-bandh-called-by-prakash-ambedkar-over-delhi-student-protest-lathicharge : प्रकाश आंबेडकरांचे सर्व विरोधी पक्षांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

Mumbai: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांची मागणी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधासाठी हा बंद पुकारण्यात आला असून, राज्यातील सर्व विरोधी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या काही आठवड्यांपासून विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांना प्रशासनाने रुग्णालयात दाखल केल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि इतर आंदोलनकर्त्यांनी उपोषणाची धुरा सांभाळली. याच आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या कथित लाठीचार्जनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Sharad Pawar : जंतरमंतरवर आंदोलनाला पाठिंबा, त्यानंतर मोदींसोबत चर्चा !

या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर यांनी या बंदाबाबत माहिती देताना डाव्या पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा दावा केला. तसेच काही शैक्षणिक संस्था आणि राज्यातील कोचिंग क्लासेसही संपर्कात असून आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, या बंदमुळे राज्यातील काही भागांमध्ये दुकाने, बाजारपेठा आणि व्यावसायिक आस्थापने स्वेच्छेने बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र रुग्णालये, औषध दुकाने, आपत्कालीन सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

NEET paper leak : दिल्लीतील विद्यार्थी प्रश्नावर बुलढाण्यात ठाकरे शिवसेनेचे आक्रमक आंदोलन; अनेक शिवसैनिक ताब्यात

सार्वजनिक वाहतूक सेवा नियमित सुरू राहण्याची शक्यता असली तरी विविध ठिकाणी आंदोलन, निदर्शने किंवा रस्तारोको झाल्यास वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना वाहतुकीची सद्यस्थिती तपासून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राजधानी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले असून, आजच्या ‘महाराष्ट्र बंद’ला किती प्रतिसाद मिळतो आणि त्याचा राज्यातील जनजीवनावर किती परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!