mpsc-irregularities-paper-leak-congress-protest-students-nagpur : पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी
Nagpur : स्पर्धा परीक्षांच्या विस्कळीत नियोजनामुळे आणि वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विद्यार्थ्यांच्या भवित्याशी खेळणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल, असा संतप्त इशारा काँग्रेसने दिला.
स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी पुण्यात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला काँग्रेसने जाहीर पाठिंबा दर्शवला असून, नागपुरातूनही राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडण्यात आली. एमपीएससीसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये सातत्याने होणाऱ्या पेपरफुटी, गैरप्रकार, परीक्षा पद्धतीतील कथित मनमानी आणि निकाल प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षांची मेहनत वाया जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
Student Protest : नीट परीक्षेच्या धर्तीवर एमपीएससीविरोधात विरोधक आक्रमक
पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या एमपीएससीच्या संबंधित अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये. या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी काँग्रेसने केली. वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करून सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी होत असताना सरकारने गप्प बसू नये. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर तातडीने आणि कालबद्ध पद्धतीने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.
Mahayuti Controversy : संजय दत्तच्या मराठीवरून शिवसेना-भाजप आमदार आमनेसामने
काँग्रेसने एमपीएससीच्या कारभारातील गैरप्रकारांची सखोल चौकशी करणे, पेपरफुटी करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करणे, वादग्रस्त ‘नॉर्मलायझेशन’ पद्धत तातडीने बंद करणे, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणे आणि रखडलेल्या सर्व शासकीय भरती प्रक्रिया तातडीने सुरू करणे, या प्रमुख मागण्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या कष्टाचा आणि मेहनतीचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. तरुणांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत रस्त्यावर उतरून लढा देईल, असा आक्रमक पुनरुच्चार नागपुरातून करण्यात आला.








