व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग

Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग

devendra-fadnavis-delhi-visit-after-dharmendra-pradhan-resignation-sanjay-raut-reaction : देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीत, संजय राऊतांचा मोठा दावा

Mumbai: नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झालेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांना तातडीने दिल्लीत का बोलावले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी त्यांच्या दौऱ्यामुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पहाटे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास ते सोलापूरहून दिल्लीकडे रवाना झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, ते दिल्लीत पोहोचले असून केंद्रीय नेतृत्वासोबत त्यांच्या बैठका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NEET paper leak : प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले प्रधानांना वाचवण्याचे गुपित, एक आठवड्याचा दिला सरकारला अल्टिमेटम

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, रविवारी मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली होणाऱ्या तिरंगा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तसेच देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे फडणवीसांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, दिल्लीत झालेल्या घडामोडींनंतर केंद्र सरकारला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. त्यामुळे या दौऱ्याचे नेमके कारण अधिकृतरीत्या स्पष्ट होईपर्यंत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मोठा दावा केला. त्यांच्या मते, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होऊ शकते. फडणवीस हे उच्चशिक्षित, कायद्याचे अभ्यासक आणि विविध विषयांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे नेते असल्याने त्यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राऊत यांनी म्हटले.

NEET paper leak : मोहन भागवत यांनी आता प्रवचने देण्याऐवजी थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागायला हवा

संजय राऊत यांनी दावा केला की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आणि त्यानंतरच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. त्यांनी या आंदोलनाला देशातील लोकशाहीसाठी महत्त्वाचा टप्पा संबोधत, तरुणांनी लोकशाहीला नवे बळ दिल्याचेही म्हटले. तसेच सत्ताधाऱ्यांनी आंदोलनाला परदेशी निधीचा आधार असल्याचे आरोप केले होते, मात्र विद्यार्थ्यांनी शांततेने लढा देत सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडल्याचा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. राज्यातील प्रमुख नेत्यांचे राजकीय निर्णय दिल्लीतील नेतृत्वाच्या आदेशानुसार घेतले जातात, असा आरोप करत त्यांनी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली.

Rahul Gandhi: सरकारला सर्व बंद करता येते, पण पेपर फूट नाही; राहुल गांधींचे मोदी सरकारवर बोचरे ट्विट

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांवर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, “आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे. मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार,” असे स्पष्ट सांगितले होते.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या तिरंगा मोर्चाच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आयोजकांच्या माहितीनुसार, सर्व कार्यकर्ते नियोजित वेळेनुसार शिवतीर्थावर एकत्र येणार असून पुढील कार्यक्रमाची घोषणा तेथेच केली जाणार आहे.

___

error: Content is protected !!