Booth capturing’ of examinations under BJP rule; Aaditya Thackeray attacks : TET परीक्षेत थेट भाजप नेत्याची मुलेच टॉपर येत असल्याचा दावा
Mumbai राज्यभरातील विविध परीक्षांमधील गोंधळ आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या लाठीमारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि मिंधे सरकारवर अत्यंत टोकदार शब्दांत घणाघाती हल्ला चढवला.
ज्याप्रमाणे निवडणुकांमध्ये बूथ कॅप्चरिंग केले जायचे, त्याचप्रमाणे भाजपच्या राजवटीत आता परीक्षेची सेंटर्स ताब्यात घेतली जात आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच, शिक्षक पात्रता म्हणजेच TET परीक्षेत थेट भाजप नेत्याची मुलेच टॉपर येत असल्याचा गंभीर दावा करत आदित्य ठाकरेंनी शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ चव्हाट्यावर आणला.
या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आकडेमोड करण्यात भलतेच पटाईत असून परीक्षेतील या महाघोटाळ्यावर पांघरूण घालण्यासाठी ते नेहमीप्रमाणेच कोणतीतरी ‘गोलमाल’ आकडेवारी सादर करून जनतेची दिशाभूल करतील. नीट (NEET) आणि इतर परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर सरकारने गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर लाठीमार केला. विशेष म्हणजे, पोलिसांच्या या लाठीमाराचे व्हिडिओ आणि रिल्स सोशल मीडियावरून डिलीट केले जात असून विद्यार्थ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. रिल्स डिलीट करून FIR दाखल करणारे हे सरकार नक्की कोणाला घाबरत आहे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजप राजवट ही विद्यार्थीविरोधी असल्याची टीकाही त्यांनी केली.
शिवसेना (UBT) आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास देत आदित्य ठाकरेंनी विद्यार्थ्यांवरील सर्व FIR आणि गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी केली. “आम्ही आमचे वचन पाळणारे लोक आहोत, भाजप पाळणार की नाही हे माहित नाही; परंतु ज्या विद्यार्थ्यांवर केसेस दाखल झाल्या आहेत, त्यांना आमचा पक्ष मोफत कायदेशीर मदत पुरवेल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत, “हा सरकारवरचा जनतेचा राग आहे. आता देश जागृत झाला असून सरकारला जाब विचारणार आहे, असा इशारा देत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.








