MLA Pravin Pote Patil fumes over poor-quality railway underpass work; pulls up officials : पावसानंतर साईनगर-अकोली येथील रेल्वे अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी
Amravati गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर साईनगर-अकोली येथील रेल्वे अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या घटनेची गंभीर दखल घेत आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी शुक्रवारी भाजप पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान आमदार पोटे पाटील यांनी दूरध्वनीवरून रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधत अंडरपासमधील साचलेल्या पाण्याचा तातडीने उपसा करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना होणारा त्रास अत्यंत गंभीर असून त्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात अंडरपासमध्ये पाणी साचणार नाही, यासाठी रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच हा प्रश्न पूर्णपणे निकाली निघेपर्यंत प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
Disqualification notices: २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिस, भाजपसह एमआयएमच्या नेत्यांवर संकट
यानंतर आमदार पोटे पाटील यांनी महापालिका व रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. अकोली रेल्वे अंडरपासचे काम निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेत कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीला महापालिका आयुक्त मंगेश गोंदावले, महापौर श्रीचंद तेजवानी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्यासह रेल्वे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पाहणी दौऱ्यात उपमहापौर सचिन भेंडे, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, तुषार भारतीय, किरण पातुरकर, चेतन गावंडे, चेतन पवार, मंजूषा जाधव, जितू दुधाने आदी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी सहभागी झाले.








