व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Uddhav Thackeray : शिवसेनेचं चिन्ह आपल्यालाच मिळणार; नाही तर ते गोठवलं जाईल

Uddhav Thackeray : शिवसेनेचं चिन्ह आपल्यालाच मिळणार; नाही तर ते गोठवलं जाईल

uddhav-thackeray-big-statement-on-shiv-sena-symbol-during-district-heads-meeting : जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा दावा

Mumbai : शिवसेना पक्षाच्या नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. “शिवसेनेचं मूळ चिन्ह आपल्यालाच मिळेल आणि जर ते मिळालं नाही, तर ते गोठवलं जाईल,” असा विश्वास त्यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुख आणि विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखांच्या बैठकीत व्यक्त केला.
शनिवारी मुंबईतील शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची आणि विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखांची महत्त्वाची बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीनंतर ही बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटना, आगामी निवडणुका आणि चिन्हावरील कायदेशीर लढाईबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले होते. मात्र, या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून २०२२ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
नुकत्याच झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना चिन्हाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. “धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल. तसे झाले नाही, तर चिन्ह गोठवण्याचा पर्यायही समोर येऊ शकतो,” असे ते म्हणाले.

 

Election petition : मतदार नोंदवही व सीसीटीव्ही चित्रफिती सादर करण्याचे आदेश, ११ सप्टेंबरला पुराव्यांवरील सुनावणी

बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेच्या कामकाजावरही विशेष भर दिला. एसआयआर प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, ज्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडणे शक्य नसेल, त्यांनी पद सोडावे, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी इशाराही दिला.
“पक्षाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पुढे संधी दिली जाईल. जर कोणाला काम करणे शक्य नसेल, तर त्यांची जबाबदारी इतरांकडे सोपवली जाईल,” असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी आतापासूनच कामाला लागण्याचे निर्देश दिले. “पुढील मोठ्या निवडणुकांसाठी फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या मतदारसंघात संघटना मजबूत करण्यावर भर द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, शिवसेनेच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे भवितव्य आणि राज्यातील पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.
__

error: Content is protected !!