व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Dr D Y patil : माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील...

Dr D Y patil : माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

padmashri-dr-d-y-patil-passes-away-educationist-former-governor-and-cooperative-leader : शिक्षण, राजकारण आणि सहकार क्षेत्रातील दैदिप्यमान पर्व संपले

Kolhapur : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डॉ. डी. वाय. पाटील यांचे बुधवारी वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, राजकारण आणि सहकार क्षेत्रातील एक मोठे पर्व संपुष्टात आले आहे. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. महाराष्ट्रात शिक्षणसम्राट म्हणून ओळख असलेल्या डॉ. पाटील यांच्या निधनामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप येथे जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून आपला प्रवास सुरू केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकारणात पदार्पण केले. १९५७ ते १९६२ या कालावधीत त्यांनी कोल्हापूरचे महापौर म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले.
कार्यकर्ता ते राज्यपाल असा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. केंद्रात सत्तांतर झाल्यानंतरही त्यांच्या कार्यशैलीचा सन्मान राखत त्यांना राज्यपालपदी कायम ठेवण्यात आले होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

 

 

Cabinet decision : शेतकरी, शेतमजूर आणि न्यायव्यवस्थेला मोठा दिलासा

शिक्षण क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारलेले कार्य आजही लाखो विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे. नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि देशातील विविध भागांमध्ये त्यांनी विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे आणि कोल्हापूरमधील शैक्षणिक संस्था आज देशभरात प्रसिद्ध आहेत.
शिक्षणाबरोबरच क्रीडा आणि वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या संस्थांमधून शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी आज देश-विदेशात विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत.

“जे कराल ते मनापासून करा आणि जिथे जाल तिथे सर्वोच्च बना,” हा संदेश डॉ. डी. वाय. पाटील नेहमी विद्यार्थ्यांना देत असत. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांचा ध्यास होता.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्याचा ठसा कायम स्मरणात राहणार आहे.
__

error: Content is protected !!