व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Santosh Pandit : संतोष पंडितांची येरवडा कारागृहातून सुटका

Santosh Pandit : संतोष पंडितांची येरवडा कारागृहातून सुटका

 

santosh-pandit-bail-release-yerwada-jail-pune-chandrakant-patil-case : बाहेर येताच म्हणाले, “मी थांबणार नाही, प्रश्न विचारत राहणार”

Pune: पुण्यातील यू-ट्युबर संतोष पंडित यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली आहे. १६ सप्टेंबर रोजी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पंडित कारागृहाबाहेर आले. सुटका झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

जामीन मंजूर करताना न्यायालयाने संतोष पंडित यांच्यावर काही अटीही घातल्या आहेत. संबंधित फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये, तसेच या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप किंवा छेडछाड करू नये, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. कारागृहातून बाहेर आल्यानंतर संतोष पंडित यांनी हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. “जे काही घडलं, तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. मात्र, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी जे काही करतो, तो माझा संवैधानिक अधिकार आहे. हा अधिकार मी यापूर्वीही बजावत होतो आणि पुढेही बजावत राहणार,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

तसेच, आपण थांबणार नसल्याचेही पंडित यांनी स्पष्ट केले. लोकशाही व्यवस्थेत जनतेला सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आपण कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक टीका केलेली नाही, तर लोकप्रतिनिधी आणि सत्तेत असलेल्या व्यक्तींना जनतेच्या प्रश्नांबाबत जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

Ajay Baraskar : ब्रह्मराक्षस, पाळीव कुत्रं, टेंडर योद्धा; उपोषण स्थगित होताच गंभीर आरोपांची सरबत्ती

दरम्यान, संतोष पंडित हे पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांबाबत तसेच विविध कामांमधील त्रुटींवर भाष्य करणारे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि असभ्य भाषेचा वापर असलेली व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमावर प्रसारित केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुनील पांडे यांच्या तक्रारीवरून डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, असा आशय मांडताना संबंधित व्हिडीओमध्ये मंत्र्यांवर टीका करण्यात आली होती. मात्र, या टीकेसोबत शिवीगाळ आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आता न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर संतोष पंडित यांनी पुन्हा जनतेचे प्रश्न मांडत राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

___

error: Content is protected !!