politics-row-over-gungi-gudiya-remark-against-sunetra-pawar-ncp-protests-in-nagpur-and-nashik : ‘गुंगी गुडिया’ वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय वादळ
Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने केलेल्या अत्यंत वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय संघर्ष पेटला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांचा “गुंगी गुडिया” असा उल्लेख केल्याने महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून, याविरोधात नागपूर आणि नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले.
नागपूरमधील निदर्शनांदरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला चपलांचा चोप देत निषेध व्यक्त केला. तसेच, महिला नेतृत्वाचा अवमान केल्याचा आरोप करत सपकाळ यांनी महाराष्ट्रातील महिलांची तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवरही हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे दिसून आले. “गुंगी गुडिया” हा उल्लेख योग्य असल्याचा पुनरुच्चार करत, “सुनेत्रा पवार तशा नसतील तर त्यांनी दुर्गेचे रूप दाखवावे,” असे आव्हान त्यांनी दिले. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा रखडलेला तपास, लाडक्या बहिणी योजनेतील मदतवाढीचा मुद्दा आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारासारख्या विषयांवर उपमुख्यमंत्री या नात्याने सुनेत्रा पवार यांनी सरकारविरोधात अधिक आक्रमक भूमिका घ्यावी, असे स्पष्टीकरणही सपकाळ यांनी दिले.
या संपूर्ण प्रकरणामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सपकाळ यांच्या टीकेचे समर्थन केल्याने वादाला आणखी धार आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत घुसून जाब विचारल्याने राजकीय वातावरण तापले होते.
सध्या हा वाद केवळ एका विधानापुरता मर्यादित राहिलेला नसून, आगामी काळात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात या प्रकरणाचे पडसाद पुढील काही दिवस उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








