eknath-shinde-warning-to-four-shivsena-ministers-over-performance-and-cabinet-reshuffle : एकनाथ शिंदेंचा चार मंत्र्यांना सज्जड इशारा
Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षातील काही मंत्र्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत चार मंत्र्यांना थेट इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयात मंगळवारी झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिंदे यांनी संबंधित मंत्र्यांना कामगिरीत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश देत, अन्यथा मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याची वेळ येऊ शकते, असे स्पष्ट शब्दांत सुनावल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, वने, मदत व पुनर्वसन तसेच मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह आणखी एका मंत्र्याला एकनाथ शिंदे यांनी बैठकीत फैलावर घेतले. अनेक वेळा सूचना देऊनही संबंधित खात्यांच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने शिंदे नाराज असल्याचे समजते.
बैठकीदरम्यान, “तुम्ही सर्वांनी कामाची गती वाढवा, अन्यथा मला खांदेपालटाचा निर्णय घ्यावा लागेल,” असा स्पष्ट इशारा शिंदे यांनी दिल्याचे सांगितले जाते. मंत्र्यांच्या कामगिरीसोबतच पक्षविस्तारासाठी अपेक्षित योगदान मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेत मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी स्वतंत्र अहवाल तयार केला जातो. आगामी अहवालात संबंधित मंत्र्यांच्या कामगिरीत सुधारणा दिसून न आल्यास त्यांची मंत्रिपदे धोक्यात येऊ शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या मंत्र्यांपुढे आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित नगरसेवकांच्या प्रशिक्षण शिबिरातही लोकप्रतिनिधींना शिस्त आणि अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. महापालिकेच्या सभागृहात शेवटपर्यंत बसून कामकाज समजून घेणारा लोकप्रतिनिधीच पुढे मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळू शकतो, असे त्यांनी सांगितले.
स्वतःच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “मीदेखील सभागृहात शेवटच्या बाकावर बसायचो; पण सातत्याने काम करत आज पहिल्या बाकापर्यंत पोहोचलो आहे.” शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास हा मेहनत, संयम आणि लोकांशी असलेल्या नात्यावर अवलंबून असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्री-कॅबिनेट बैठकीतील या घडामोडींमुळे शिवसेनेत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असून, आगामी काही महिन्यांत पक्ष आणि सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








