व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Tukaram Mundhe : ‘सावजी मटण खाऊ नका’ असे मी म्हटलेच नाही

Tukaram Mundhe : ‘सावजी मटण खाऊ नका’ असे मी म्हटलेच नाही

tukaram-mundhe-clarifies-savji-mutton-remark-says-i-never-asked-people-not-to-eat-it : तुकाराम मुंडेंचा वादावर स्पष्ट खुलासा

Nagpur : आपल्या धडक कारवाया आणि कणखर प्रशासकीय शैलीमुळे कायम चर्चेत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे हे नागपूरच्या प्रसिद्ध सावजी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अलीकडेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र, या प्रकरणावर आता त्यांनी स्पष्टीकरण देत, “मी सावजी मटण खाऊ नका असे कधीच म्हटले नाही. माझा उद्देश केवळ त्यातील प्रमाणाबाहेर तेल, मीठ आणि मसाल्यांमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधण्याचा होता,” असे स्पष्ट केले आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्यभर धडक कारवाया सुरू केल्या आहेत. अनेक व्यावसायिक आणि कंपन्यांवर कठोर कारवाई केल्याने त्यांच्या कामकाजाची चर्चा सुरू असतानाच, नागपूरमधील एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना त्यांनी आरोग्याविषयी बोलताना “सावजी मटण खाल्ल्याने माणूस महिनाभर आजारी पडू शकतो,” असे वक्तव्य केले होते. या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

नागपूरचे सावजी मटण हे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय खाद्यपदार्थ मानले जाते. नागपूरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख असलेल्या सावजी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी राज्यभरातून आणि बाहेरूनही अनेक खवय्ये नागपुरात येतात. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सावजी पदार्थांचा स्टॉल सुरू करण्याची सूचना केली होती. अशा पार्श्वभूमीवर सावजी मटणावरील वक्तव्यामुळे व्यावसायिक आणि सावजीप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती.
या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपूरमधील सावजी हॉटेल चालकांनी एकत्र येत आंदोलन केले. मुंडे यांच्या वक्तव्यामुळे सावजी व्यवसायाची प्रतिमा मलिन होत असून त्याचा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करत काही व्यावसायिकांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला होता.

Nitin Gadkari : नितीन गडकरींना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

दरम्यान, वाढत्या वादानंतर तुकाराम मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. “मी सावजी मटण खाऊ नका असे कधीही म्हटलेले नाही. माझा रोख केवळ त्यातील तेल, मीठ, तिखट आणि मसाल्यांच्या अतिप्रमाणातील वापराकडे होता. एवढ्या प्रमाणात तेल आणि मीठ शरीरात गेल्यास कोणतीही व्यक्ती आजारी पडू शकते. हा सल्ला फक्त सावजी मटणापुरता नसून, कोणतेही अतितेलकट आणि मसालेदार अन्न खाणाऱ्या प्रत्येकासाठी आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुंडे यांच्या या स्पष्टीकरणानंतर सावजीप्रेमी आणि व्यावसायिकांचा काहीसा रोष कमी झाल्याचे दिसत असले, तरी या संपूर्ण प्रकरणामुळे नागपूरच्या राजकीय, सामाजिक आणि खाद्य वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आता या खुलाशानंतर सावजी व्यावसायिक पुढे कोणती भूमिका घेतात आणि या वादावर पूर्णविराम लागतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
__

error: Content is protected !!