raj-thackeray-slams-government-over-kumbh-mela-contractors-and-nashik-road-condition : नाशिक दौऱ्यात राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
Nashik: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान आगामी कुंभमेळ्याच्या तयारीवरून राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वाढते खड्डे, वृक्षतोड आणि गुजरातमधील कंत्राटदारांना दिलेली कामे यावरून त्यांनी सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं आहे,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी प्रशासनावर निशाणा साधला.
नाशिकमध्ये यापूर्वी २००३ आणि २०१५ असे दोन कुंभमेळे पार पडले होते. २०१५ मधील कुंभमेळ्याचा उल्लेख करताना राज ठाकरे म्हणाले की, त्या वेळी शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली होती, मात्र नागरिकांना त्याचा कोणताही त्रास झाला नव्हता. कामे पूर्ण झाल्यानंतर शहरातील बदल स्पष्टपणे दिसून आला होता. त्या वेळी आर्थिक लाभ किंवा कमिशन हा उद्देश नव्हता, त्यामुळे सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली होती, असे त्यांनी सांगितले.
Prashant Kishor : ‘माझ्यासोबत काम करायचे असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत ठोस निर्णय घ्या’
मात्र, सध्याच्या परिस्थितीवर टीका करताना त्यांनी शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांचे बळी गेल्याचा मुद्दा उपस्थित केला. “लोकांचे जीव जात आहेत, पण प्रशासनाला त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही. कामांमधून कमिशन कसे मिळेल, याचीच चिंता प्रशासनाला आहे,” असा आरोप त्यांनी केला.
कुंभमेळ्याच्या कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना संधी देण्यात आल्याच्या चर्चेवरही राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. “महाराष्ट्रात कंत्राटदार नाहीत का? वरून आदेश येतात आणि त्यानुसार कामे केली जातात. महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्ट अशाच पद्धतीने हाताळली जात असेल, तर हे दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी नाशिकमधील बोटॅनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारण्यात आलेले संग्रहालय आणि स्मार्ट सिटी योजनेचाही उल्लेख केला. “स्मार्ट सिटीची घोषणा करण्यात आली होती, पण त्याचे पुढे काय झाले? आज ती स्मार्ट सिटी कुठे आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वृक्षतोडीवरूनही राज ठाकरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अनेक आंदोलने होऊनही प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, “हे सर्व सुरू असताना नागरिक पुन्हा त्याच पक्षाला निवडून देत असतील, तर त्याचे परिणामही त्यांनाच भोगावे लागतील,” असे म्हणत त्यांनी मतदारांनाही खडे बोल सुनावले.
राज ठाकरे यांच्या या टीकेमुळे नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीवर आणि शहरातील विकासकामांच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.








