व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rakesh Tikait : ‘मी दिल्लीत आंदोलन उभारतो, तुम्ही अकोल्यातून साथ द्या’; राकेश...

Rakesh Tikait : ‘मी दिल्लीत आंदोलन उभारतो, तुम्ही अकोल्यातून साथ द्या’; राकेश टिकैत यांची शेतकऱ्यांना हाक

“I will spearhead the agitation in Delhi; you support it from Akola,” Rakesh Tikait appeals to farmers : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याची तयारी

Akola शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू झाली असून, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी अकोल्यातूनही आंदोलनाची ताकद उभी करण्याचे आवाहन केले. “मी दिल्लीत आंदोलन उभारतो, तुम्ही अकोल्यातून साथ द्या,” अशी थेट हाक त्यांनी शेतकऱ्यांना दिली. प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

शेतकऱ्यांनी केवळ दिल्लीकडे पाहत न बसता प्रत्येक जिल्ह्यात आपापल्या प्रश्नांवर आंदोलने उभी करावीत, असे टिकैत यांनी सांगितले. महिन्यातील एक दिवस निश्चित करून ५० ते १०० शेतकऱ्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी आणि शेतीशी संबंधित प्रश्न मांडावेत. सातत्याने प्रश्न मांडल्यास प्रशासनावर दबाव निर्माण होऊन त्याच्या सोडवणुकीची प्रक्रिया सुरू होईल, असे त्यांनी नमूद केले.

“येथे विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातही आंदोलन सुरू करा. प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनाची माहिती दिल्लीतील सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचत असते,” असे टिकैत म्हणाले. या आंदोलनात युवकांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Uddhav Thackeray Shivsena: नागपूर उद्धव सेनेत अंतर्गत कलह शिगेला; संपर्कप्रमुखांच्या विरोधात पदाधिकारी एकवटले, लवकरच मुंबईत धडकणार!

‘सत्ताधाऱ्यांना घाबरवणारा आवाज हवा’

दिल्लीतील सत्ताधारी घाबरतात; मात्र त्यांना घाबरवणारा आवाज आणि संघटित शक्ती आवश्यक आहे, असे टिकैत यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या मागण्यांसाठी संघर्ष उभा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘५० वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी लढा’

भारतीय किसान युनियनचे पदाधिकारी युद्धवीर सिंग यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. पहाटे चार वाजल्यापासून रात्रीपर्यंत शेतकरी कुटुंबातील सदस्य शेतात राबतात; मात्र, त्यांना दोन वेळचे अन्न मिळेल एवढेही उत्पन्न मिळत नाही. ही परिस्थिती सरकारच्या धोरणांचा परिणाम असल्याचा आरोप त्यांनी केला.

भारतीय किसान युनियन ही राजकीय संघटना नसून, गेल्या ५० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात येणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वऱ्हाडीतून शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा

कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी तेजराव भाकरे यांनी वऱ्हाडी भाषेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. गावातील रस्त्याचे काम गेल्या ३० वर्षांपासून रखडल्याचा दाखला देत विविध पक्षांचे नेते निवडून आल्यानंतरही प्रश्न सुटला नसल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात दिल्या जाणाऱ्या आश्वासनांचा उल्लेख करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Eknath Shinde : जरांगेंच्या टीकेनंतर शिंदेंची मोठी राजकीय चाल?

कवितेतून शेती-मातीचा आक्रोश

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवींनी शेती आणि मातीशी संबंधित कविता सादर करून शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडली. विठ्ठल कुलट, किशोर बळी, विशाल कुलट यांच्यासह कवींनी कविता सादर केल्या.

यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांनी भारत-अमेरिका शेती व्यापार कराराबाबत माहिती दिली तसेच राकेश टिकैत यांचा परिचय करून दिला. भारतीय किसान युनियनचे पदाधिकारी युद्धवीर सिंग, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर नलावडे, सचिव रूपाली पाटील आणि राजवीर जदौन उपस्थित होते. चंद्रशेखर नलावडे आणि राजवीर जदौन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अक्षय राऊत यांनी केले.

error: Content is protected !!